सरत्या वर्षाने सलमान खानला बऱ्याच गोष्टी देऊ केल्या असे म्हणायला हरकत नाही. न्यायालयातील पायपीट ते अगदी त्याच्या चित्रपटांना मिळालेला प्रतिसाद. या सर्व गोष्टींमुळे सलमानसाठी २०१७ हे वर्ष खऱ्या अर्थाने बऱ्याच घडामोडींचे ठरले. मुख्य म्हणजे वर्षाचा शेवटसुद्धा आनंदातच झाला. कारण, अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सलमान आणि कतरिनाची जोडी आणि अफलातून साहसदृश्यांनी ‘टायगर…’च्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
समीक्षक आणि प्रेक्षकांची चांगली दाद मिळवणाऱ्या या चित्रपटाची सोशल मीडियापासून ते चित्रपट वर्तुळापर्यंत सर्वच ठिकाणी चर्चा पाहायला मिळतेय. पण, सर्व गोष्टी सुरळीत सुरु असतानाच स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरके यांनी मीठाचा खडा टाकला आहे. केआरकेने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत सलमानची खिल्ली उडवली आहे. काही वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या ‘हिट अँड रन केस’चा आधार घेत राजू आणि केआरकेने त्याची खिल्ली उडवली.
PHOTO : ‘हे’ चित्र विकून जस्टिन बिबरने केली कॅलिफोर्नियातील पीडितांना मदत
‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता यावर तुमचे काय म्हणणे आहे, असे केआरकेने राजूला विचारताच राजूने यावर आपल्या अंदाजात उत्तर दिले. ‘कोणी फुटपाथवर झोपू नका आणि जर कोणी फुटपाथवर झोपत असेल, तर त्यांना तसे करण्यापासून थांबवा, कारण ‘टायगर अभी जिंदा है”, असे राजू म्हणाला आणि त्यानंतर ते दोघेही खळखळून हसले. राजूचा हा उपरोधिक अंदाजातील विनोद पाहून आता सलमान यावर काय प्रतिक्रिया देतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.