– उदय गंगाधर सप्रे

आज संपूर्ण जग प्रेममय झालं आहे. तसा प्रेमाला कोणताही एक दिवस नसतो असे म्हणतात. पण तरीही १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. १४ फेब्रवारी हा जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो, पण कट्टर भारतीय सिनेरसिकांसाठी हा दिवस त्याहून मोठा आहे. जगन्नियंत्या परमेश्वराने आजपासून बरोब्बर ८५ वर्षांपूर्वी एक अप्रतिम लावण्य जन्माला घातलं जिला लोक मधुबाला या नावाने ओळखतात. आज सर्वत्र ‘व्हेलेंटाइन डे’ साजरा होत असताना भारतीय सिनेप्रेमी मात्र १४ फेब्रुवारी हा दिवस ‘मधुबाला डे’ म्हणूनच साजरा करतो. यादिवसाचे औचित्य साधून आजपासून सलग १० दिवस लोकसत्ता ऑनलाइन तुम्हाला या आरसपानी सौंदर्याबद्दल कुठेही न वाचलेल्या गोष्टी सांगणार आहे.

१४ फेब्रुवारी १९३३ रोजी जन्मलेली मधुबाला २३ फेब्रुवारी १९६९ रोजी वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी हे जग सोडून गेली. वयाच्या ९ व्या वर्षी हिंदी चित्रपटात वसंत म्हणून अवतरलेलं हे बालकलाकार रूपातील लावण्य पुढे नायिका म्हणून ज्वाला रूपात समाप्त झालं. अवघ्या २५ वर्षांच्या कारकीर्दीत ७१ चित्रपटात काम करून कोट्यावधी लोकांच्या काळजाचा तुकडा झालेल्या या अत्युत्कृष्ट सौंदर्यवतीचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा जीवनपट मी आज मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मधुबालाविषयी लिहिणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे. पण खरं सांगायचं तर त्या काळातील कोणाच्याही मनात मधुबाला नसेल असे होणे अशक्यच. मनाचा असा एकही कोपरा नाही जिथे मधुबाला व्याप्त नाही, अशीच अनेकांची भावना आजही असेल यात तिळमात्र शंका नाही.

दिल्लीतल्या चाँदनी चौकाजवळील एक झोपडपट्टी- नामचिन वेश्यावस्ती असलेलं एक कुप्रसिद्ध ठिकाण. लाहोरहून रोजीरोटीच्या शोधात आलेल्या अताउल्ला खान देहलवी या पठाणाकडे ना शिक्षण ना कनवटीला बक्कळ पैसा. मग पाठ टेकायला आणि संसारासाठी जागा म्हणून याशिवाय वेगळं ठिकाण त्याला सापडतं तरंच नवल. त्यांची बेगम आयेशा यांना पाचव्यांदा दिवस गेलेले. पहिले २ मुलगे जन्मत:च गेले. त्यांच्यापाठची कनीझ व अल्ताफ घाबर्‍या जीवानिशी झोपडीबाहेर थांबलेल्या.

१४ फेब्रुवारी १९३३ चा दिवस: आत दिवस भरलेली व प्रसूतिवेदनांनी तळमळणारी आयेशा बेगम व वस्तीच्या जवळपास रहाणारी एक सुईण. एरव्ही गरीब गाय असणारी आयेशा प्रसूतिवेदना असह्य होऊन नवर्‍याला शिव्या घालत वेदनांनी तळमळत होती. तर झोपडीच्या बाहेर आपली बेगम बाळंतपणात मरते की काय? या शंकेने व्याकूळ झालेला अताउल्ला खान अस्वस्थपणे येरझार्‍या घालत होता. एका भयंकर किंकाळीनंतर काळजाचा ठोका चुकवणारी शांतता पसरली. आपली बेगम सुखरूप तर असेल ना या चिंतेने खानांनी डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्या वेळात सुईण पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं छोटंसं बाळ घेऊन बाहेर आली आणि खान यांना म्हणाली, ‘माझ्या संपूर्ण आयुष्यात मी एवढी सुंदर मुलगी पाहिली नाही.’

अताउल्ला खान यांना बायको वाचली म्हणून हसावे की तिसरी मुलगीच झाली म्हणून रडावे हे कळत नव्हते. दोन मुलींनंतर किमान तिसरा मुलगा व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती. पण त्यांना हे कुठे माहित होते की ही तिसरी मुलगीच एका कर्तृत्ववान मुलाप्रमाणे आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांना आणि कुटुंबाला अमाप ऐश्वर्यात ठेवणार आहे.

तिचं नांव ठेवण्यात आलं मुमताज जहान बेगम देहलवी. सर्वसामान्य मुलींप्रमाणे मुमताज मोठी होत होती. दिवसांमागे दिवस जात असताना एक दिवस त्यांच्या घरी वलीखान नावाचा फकीर आला. ज्योतिषशास्त्राचा त्याचा दांडगा अभ्यास होता. अताउल्ला खान आणि आयेशा बेगम लहानग्या मुमताजला घेऊन झोपडीबाहेर बसले होते. तिला पाहताच वली खान म्हणाला, ही मुलगी फार प्रसिद्ध होणार आहे. सारे सुख तिच्या पायदळी असेल. पण…. असं म्हणून तो काही क्षण थांबला. त्यानंतर अत्ताउल्ला खानने पैशांची मागणी केली. त्यावर वेड्या बापाने फकीराकडे प्रश्नांचा रतीबच लावला. काही चिंतेचं कारण आहे का? जर काही असेल तर आत्ताच सांगा. आम्ही ते ऐकायला तयार आहोत. पण बेगम आयेशाने मात्र पुढे काही न सांगण्याचे सांगितले. मुमताजच्या आनंदातच आमचा आनंद आहे. त्याहून जास्त काही ऐकण्याची गरज नसल्याचे तिचे म्हणणे होते. पण बापाला आपल्या मुलीचे भविष्य जाणून घेण्याची इच्छा होती. त्याने वली खानला पुढे बोलण्याचा आग्रह केला. तेव्हा वली खान म्हणाला की, ‘देवाची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे ही मुलगी. पण चंद्रावरही डाग आहे. त्याचप्रमाणे हीच्या लग्नात अनेक विघ्न येतील. लग्न झाल्यानंतर यशाच्या शिखरावर असतानाच तिचा मृत्यू होईल…’

माणसाचं मन नेहमी चांगलं कळेल तेवढ्यावरंच आश्वस्त होतं व वाईट ते भविष्य खोटं ठरेल या आशेवर राहतं. मुमताजच्या आईचीही काहीशी अशीच स्थिती होती. आयेशा यांचा भविष्यावर आणि फकिरावर विश्वास होता खरा पण मुलीचे जे काही भविष्य सांगितले त्यावर नाही. अताउल्ला खान तर मनोमन हादरले होते. पण आपल्या मनातील भाव त्यांनी चेहऱ्यावर येऊ दिले नाही.

वर्ष सरत गेली आणि अताउल्लाखानचं कुटुंब सातजणांचं झालं. अताउल्ला खान, बेगम आयेशा आणि कनीझ, अल्ताफ, मुमताज, शाहिदा आणि जहिदा या पंचकन्या. मुमताझ मधली असल्यामुळे तिला मझली आपा म्हणून संबोधले जाऊ लागले. अताउल्ला काही कामानिमित्त मुंबईला आले. त्यांच्यासोबत सहा वर्षांची मुमताजही होतीच. मुलीला मुंबईत काही तरी दाखवावं या हेतूने ते तिला घेऊन सहज सागर स्टुडिओमध्ये गेले. सागर स्टुडिओमधील वातावरण पाहून दिल्लीत आल्यावर मुमताजने नृत्य आणि संगीत शिकण्याचा आग्रह बाबांकडे केला. तिचा कलेमधील कल पाहून त्यांनी मुमताजची नृत्य आणि संगीत याची तालीम सुरू केली.

तिच्या चुणचुणीतपणामुळे तिला दिल्ली नभोवाणी केंद्रामध्ये प्रवेश मिळाला. तेव्हा संगीतकार खुर्शीद अन्वर हे बालकांच्या नभोवाणीवर होणार्‍या कार्यक्रमाचे संयोजक होते. मुमताजचा सगळ्या बालकांच्या कार्यक्रमात सहभाग असायचाच. अशाच एका कार्यक्रमात बॉम्बे टॉकीजचे जनरल मॅनेजर रायबहादूर चुनीलाल कोहली (संगीतकार मदनमोहन यांचे वडील) यांनी मुमताजला पाहिलं. बॉम्बे टॉकीज त्यावेळी ‘बसंत’ नावाचा चित्रपट बनवत होते. उल्हास व मुमताज शांती यांच्या मुलीच्या भूमिकेसाठी एका लहान मुलीच्या शोधात होते. मुमताजला पाहिल्यावर त्यांचा तो शोध संपला. त्यांनी अताउल्ला खानला बॉम्बे टॉकीजची सर्वेसर्वा देविकाराणीला मुमताजसह भेटण्याचा सल्ला दिला.

नेमके याचवेळी इंडियन टोबॅको या कंपनीतून भांडून बाहेर पडलेला खान बेकार अवस्थेत होता. चुनीलाल यांचे म्हणणे ऐकताच ते दिल्ली सोडून मुंबईला कायमचे जायला एका पायावर तयार झाले. एरव्हीगही या वस्तीत मुली राहिल्या तर आसपासचं वातावरण पाहता मोठेपणी त्या पण चेहेरे रंगवून धंदा करतील अशी भिती आयेशाच्या मनात असल्याने ती पण झोपडी भाड्याने देऊन मुंबईला यायला तयार झाली. इकडे मुंबईत बॉम्बे टॉकीजमध्ये चुनीलालनी देविकाराणींशी बोलून ठेवलं होतंच. देविकाराणींनी आणि अमिया चक्रवर्तींनी बेबी मुमताजची छोटीशी मुलाखत घेतली. तिला काही प्रश्न विचारण्यात आले. मुमताजने मोठ्या धिटाईने सर्व प्रश्नांची उत्तर दिली आणि तिची बालकलाकार म्हणून निवड झाली. लगेच सिनेमासाठीचा करारही झाला. महिना १०० रुपये पगार आणि प्रवास खर्चाचे ५० आणि जेवण खाण, चहापाणी याची सोय कंपनीचीच. अजाण मुलीचा पालक म्हणून खान यांनीच करारावर सही केली. त्यांना उध्वस्त अवस्थेतून प्रकाशाचा एक किरण दिसला होता. वलीखानचं भविष्य खरं होण्याची ही सुरुवात आहे हे खान यांना तेव्हा जाणवलं होतं.

‘बसंत’ चित्रपटातील पहिला शॉटच मुमताजनं पहिल्याच टेकमधे ओके करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सगळ्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवून मुमताजचं कौतुक केलं. शेजारच्या सेटवर ‘बंधन’ चित्रपटाचे शूटिंग सुरु होतं. अशोक कुमार व लीला चिटणीसही कुतुहलानं काय झालं हे पाहण्यासाठी आले. तोवर उल्हास व मुमताज शांती ९ वर्षीय लोभस मुमताजचे भरभरून कौतुक करत होते. सगळी चौकशी झाल्यावर अशोक कुमार यांनीही एक चॉकलेट देऊन मुमताजचे कौतुक केले. (आणखीन ७ वर्षांनीच अशोककुमार बरोबर ‘महल’ सिनेमा गाजवून सोडणार्‍या नायिकेचं नायक कौतुक करत होता हे फक्त नियतीलाच माहित होतं.)

‘बसंत’मधील एक दोन गाणीही छोट्या मुमताजच्या तोंडी होती. पारूल घोषच्या आवाजातील एका गाण्याची रेकॉर्ड बेबीला ऐकवून त्या शब्दांनुसार ओठ हलवत शॉट घेतला गेला. शॉट संपल्यावर अत्यंत आत्मविश्वासानं ‘हे गाणं मीही गाऊ शकले असते, रेकॉर्ड करण्याची काय गरज?’ असे छोटी मुमताझ म्हणाली. लहानगीच्या तोंडची ही वाक्य ऐकून बसंतचे संगीतकार पन्नालाल घोष यांनी तोंडात बोटंच घातली.
बंधन चित्रपटात असलेल्या तगड्या स्टारकास्टपुढे बसंत चित्रपट कितपत टिकाव धरेल असं वाटणार्‍या तमाम रसिकांना बसंत चित्रपट आवडला. या चित्रपटाने चांगला गल्ला कमावला होता. चित्रपटातील तीन मुमताज यांनी बसंत चित्रपट अक्षरशः गाजवला. चित्रपटाची नायिका मुमताज शांती, कॅरेक्टर रोलमध्ये असलेली मुमताज अली आणि लोभस बेबी मुमताज.

‘बसंत’ चित्रपटानंतर बॉम्बे टॉकीजची नोटीस हाती पडल्यावर खान यांना नाइलाजाने कुटुंबासह पुन्हा दिल्लीला परतावे लागले होते. पण आता मुमताजने आपल्या झोपडीबाहेर हे कोणत्याही वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचे घर नसून, इथे फिल्मस्टार बेबी मुमताज राहते, असा बोर्ड लावला. असे केल्याने आपण उगीचंच शेजार्‍यांचा रोष ओढवून घेतोय असं वाटणार्‍या खानला मुमताजनं पटवून दिलं की या बोर्डमुळे आपला मानमरातब वाढण्यास मदत होईल, शिवाय भविष्यात कुणी चित्रपटासाठी आपल्याला शोधत आलंच तर या बोर्डाचीच मदत होईल. त्यानंतर ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करत आणि अजून छोटी- मोठी कामं करत २ वर्ष निघून गेली. त्यानंतर एक दिवस अमिया चक्रवर्ती या देविकाराणींचं ज्वारभाटा या चित्रपटासाठी बेबी मुमताजने काम करावे यासाठी झोपडीसमोर उभे ठाकले.अताउल्ला खानच्या हातात ५०० रुपये आगाऊ रक्कम देऊन ४ दिवसांत मुंबईला यायला सांगून अमिया मुंबईला परतले.

मुंबईला आल्यावर ३०० रुपये महिना पगारावर परत बेबी मुमताजचा करार झाला. नायक म्हणून युसूफ खानचं पंडित नरेंद्र शर्मा या गीतकाराच्या मदतीनं दिलीपकुमार असं नांव ठेवलं गेलं. पण ऐनवेळी मुमताजच्या भूमिकेलाच कात्री लावल्यामुळे तिच्या हातून ती भूमिका गेली. याखेरीज, घी मंडई येथे अताउल्ला खान यांनी एक जागा राहवयास मिळवली होती. पण एक दिवस ते सहकुटुंब चित्रपट पहायला गेले असता गोदी विभागात प्रचंड स्फोट झाला आणि ती घी मंडई आगीत जळून भस्मसात झाली. एका क्षणात सर्वस्व गमावलेले खान कुटुंब रस्त्यावर आले. योगायोगाने मुमताजची दिल्लीतील वर्गमैत्रीण तिला मुंबईत भेटली व ७ महिने तिने खान व कुटुंबाला स्वत:कडे आश्रय दिला. मुमजाजचे यानंतर सिनेसृष्टीतील स्ट्रगल सुरू झाले. चित्रपट मिळवण्यासाठी ती आणि बाबा स्टुडिओंचे उंबरे झिजवू लागले होते. असेच एकदा काम नसल्याने वेगवेगळ्या स्टुडिओचे उंबरे खान झिजवू लागला.असंच एकदा रणजित स्टुडिओमधे गेले असता अभिनेता मोतीलालशी त्याची ओळख झाली. तेव्हा रणजितच्या शिफारसीने त्यांनी सरदार चंदूलाल शहांकडे मुमताजला नेलं. सरदार चंदूलालनी मुमताजला गाता येतं का? असं विचारलं आणि ती हो म्हणताच वाद्यवृंदाबरोबर गाणं म्हणायची तयारी केली. मुमताजनं गाणं सुरु केलं पण तबलजींची व तिची लय न जमल्याने ते मध्येच बंद पडलं. आवाजाच्या चढ उताराप्रमाणे तबलजी म्हणून तुम्हाला लयकारी येत नाही काय? असं रागाने बोलणार्‍या मुमताजचं धारिष्ट्य व सुरातील सच्चेपणा जाणवून चंदूलाल शहांनी महिना ३०० रुपये पगारावर तिची बालकलाकार म्हणून नेमणूक केली.

चित्रपट निर्मितीचा कारखाना असलेल्या रणजित स्टुडिओमधे मुमताजने १९४४ मध्ये मुमताज महल, १९४५ मध्ये धन्ना भगत, १९४६ मध्ये पुजारी, फुलवारी आणि राजपुतानी तर १९४७ मध्ये सात समंदरों की मलिका या एकून सहा चित्रपटात कामं केलं. फरक इतकाच होता की बेबी मुमताज म्हणून बसंत मधे चमकलेली मुमताज या ६ चित्रपटात मधुबाला या नावाने सर्वांसमोर आली. ज्वारभाटाच्या वेळेस युसूफ खान यांचे नामकरण दिलीपकुमार करण्यात कारणीभूत ठरलेल्या देविकाराणी यांनीच मुमताज यांचे मधुबाला हे नामकरण केले.
मुळातच सुंदर व पठाण असल्याने तारुण्याने मुसमुसलेली मधुबाला आता १४ वर्षांची झाली होती. १४ व्या वर्षीच पाच चित्रपटात नायिका बनलेल्या मधुबालाचा सिनेप्रवास आपण पुढच्या भागात वाचू.