चित्रपटसृष्टीत फक्त अभिनेत्रींमध्येच काही कारणांवरुन खटके उडतात असा जर तुमचा समज असेल तर तसं नाहीये. एकाच वेळी विविध स्वभावांच्या व्यक्तींचा वावर असणाऱ्या या कलाविश्वात मतमतांतराचं हे सत्र सुरुच असतं. लहानसहान गोष्टींपासून ते अगदी बिग बजेट प्रोजेक्टपर्यंत प्रत्येक ठिकाणी वादांचं सावट पाहायल मिळतं. भन्साळींच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या बाबतीतही असंच वातावरण पाहायला मिळालं.

सुरुवातीपासूनच या चित्रपटाच्या स्टारकास्टची चर्चा होती. शाहिद कपूर, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या चित्रपटामध्य सर्वाधिक प्रकाशझोतात राहिले ते म्हणजे रणवीर आणि दीपिका. खुद्द शाहिदलाही ही बाब जाणवली आणि त्याने चित्रपटाच्या सेटवर एका क्षणाला आपल्या मनात एकटं पडल्याची भावनाही आल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर रणवीर आणि शाहिदमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं.

‘कमिने’ चित्रपटातील भूमिका मी शाहिदपेक्षा उत्तमप्रकारे निभावली असती असं रणवीरने फार आधी म्हटलं होतं. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून रणवीरने साकारलेली अलाउद्दीन खिल्जीची भूमिका मी वेगळ्या प्रकारे केली असती, असं शाहिदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

शाहिदने दिलेल्या या प्रत्युत्तरानंतर रणवीरचं वक्तव्यही प्रकाशझोतात आलं आणि या दोन्ही अभिनेत्यांचा वाद सर्वांसमोर उघड झाला. पण, आपल्या एका वक्तव्यामुळे कलाविश्वात बऱ्याच चर्चांना उधाण आल्याचं लक्षात येताच रणवीरने काही गोष्टी स्पष्ट करत दिलगिरी व्यक्त केली. ‘चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यावेळी मी खूपच उद्धट होतो. त्यावेळी मी तसं बोलायला नको हवं होतं. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो’, असं म्हणत रणवीरने झाल्या प्रकरणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केल्याचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने प्रसिद्ध केलं. तेव्हा आता रणवीरचं हे स्पष्टीकरण ऐकून शाहिद यावर काही प्रतिक्रिया देणार का आणि या दोन्ही अभिनेत्यांमध्ये असणारा वाद मिटणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.