बॉलिवूड विश्वात घराणेशाहीच्या मुद्द्याला एका अर्थी अभिनेत्री कंगणा रणौतनेच वाचा फोडली. तिच्या याच वक्तव्यामुळे थेट आयफा पुरस्कार सोहळ्यामध्येही तिच्यावर निशाणा साधण्यात आला. करण जोहर, सैफ अली खान आणि वरुण धवन यांच्या स्किटमधून कंगनावर उपरोधिक टिका करण्यात आली. पण, आता मात्र करणला आपल्या वक्तव्याचा पश्चाताप झाला असून त्याने याप्रकरणी माफी मागितली आहे.
करणच्याच कार्यक्रमात पाहुण्या कलाकाराच्या रुपात आलेल्या कंगनाने करणला घराणेशाहीचा झेंडा मिरवणारा म्हणत एका नव्या चर्चेला तोंड फोडलं होतं. तेव्हापासूनच या दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. आरोप- प्रत्यारोप आणि एकमेकांवर जाहीरपणे टीका करत या कलाकारांनी घराणेशाहीच्या मुद्द्याला आणखीनच हवा दिली. नुकत्याच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान तर या वादाचा कहरच झाला.

सैफ, वरुण आणि करण यांनी आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान ‘नेपोटिझम रॉक्स’ म्हणत कंगनावर अप्रत्यक्ष वार केला. बी- टाऊन कलाकारांची ही आचरट विनोदबुद्धी अनेकांनाच खटकली. सोशल मीडियावर बऱ्याचजणांनी याविरोधात ट्विटही केले. आपल्या वक्तव्याला होणारा हा विरोध पाहता करणने आता कंगनाची माफी मागितलीये. त्या स्कीटची संपूर्ण जबाबदारी स्वत:वर घेत ‘तो’ विनोद करण्याची कल्पना माझीच होती असं म्हणत चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या त्या विनोदाविषयी त्याने माफी मागितली.

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट

याविषयी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या माहितीत करण म्हणाला, ‘मी हे स्पष्ट करुन इच्छितो की, घराणेशाहीवर माझा विश्वास नाही. आणि मी त्याला प्रोत्साहनही देत नाही. त्यामुळे ‘नेपोटिझम रॉक्स’वगैरे असं काही मला वाटत नाही. इथे फक्त तुमच्या कामाप्रती समर्पण, कौशल्य आणि तुमची महत्त्वाकांक्षा याच गोष्टींना महत्त्व आहे.’ याविषयी आणखी सारवासारव करत करण म्हणाला, ‘आम्ही केलेल्या त्या विनोदाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. त्याबद्दल मी माफी मागतो. कारण, ती कल्पना माझीच होती. त्यामुळे आम्ही जे काही बोललो त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. काही बाबतीत आम्ही मर्यादा ओलांडल्या.’ करणने आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करताना कंगनाचं कौतुकही केलं. ती स्वावलंबी असून, प्रतिभाशाली कलाकार आहे, असं तो म्हणाला.