बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाचा दुसरा मिनी ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. याआधी चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये शाहरुखच्या भूमिकेविषयीची माहिती मिळाली होती. तर आता या दुसऱ्या ट्रेलरमध्ये अनुष्का साकारत असलेल्या ‘सेजल’ या व्यक्तिरेखेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. वकिलीचा अभ्यास केलेल्या सर्वसामान्य गुजराती मुलीच्या रुपात अनुष्का या चित्रपटात झळकत आहे.
तिच्या वागण्याबोलण्यातून झळकणारी वकिली आणि त्यातच कराराची भाषा अनुष्काच्या भूमिकेला एक वेगळाच टच देत आहे. अनुष्काने साकालेली ‘सेजल’ पाहता या चित्रपटामध्ये ती एका नटखट गुज्जू मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे या ट्रेलरमध्ये सेजल- हॅरीमध्ये ‘इनडेमन्टिटी बॉण्ड’ही झाला आहे. या व्हिडिओमध्ये शारीरिक संबंधं आणि त्याबाबतचा हा करार समजून घेत असताना शाहरुखच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे आहेत. गुजराती मुलीची भूमिका साकारणाऱ्या अनुष्काची गुजराती लोकांप्रमाणेच बोलण्याची पद्धत आणि शब्दांचे उच्चार विशेष उल्लेखनीय आहे. त्यामुळे या दोन्ही भूमिकांबद्दल अधिक जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. शाहरुखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा ट्रेलर शेअर केला आहे.
इम्तियाझ अली दिग्दर्शित ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाचे मिनी ट्रेलर सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या चित्रपटात शाहरूख ‘हरविंदर सिंह नेहरा’ म्हणजेच ‘हॅरी’ या एक पंजाबी गाइडची भूमिका साकारणार आहे. तर अनुष्का गुजराती मुलगी ‘सेजल’ची भूमिका साकारणार आहे. ‘सेजल’ युरोपला फिरायला गेली असता ‘हॅरी’सोबत तिची ओळख होते आणि त्यानंतर दोघे कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात याभोवतीच या चित्रपटाचं कथानक फिरणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातून अनुष्का आणि शाहरूख तिसऱ्यांदा एकत्र येताहेत. त्यातही इम्तियाझ अलीचं दिग्दर्शन असल्यामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांना काही सुरेख ठिकाणांची सफर होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. ४ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.