वयाच्या पाचव्या, दहाव्या वर्षी तुम्ही काय केले? असा प्रश्न कोणालाही विचारला असता, बाहुल्यांसोबत खेळले, क्रिकेट खेळलो किंवा मग नुसतेच खेळलो अशीच काहीशी अपेक्षित उत्तरे मिळतात. पण अवघ्या पाच वर्षांच्या वयात ओडिसात राहणाऱ्या बुधिया अवुगा सिंग या मुलाचे कर्तृत्त्व पाहून भल्याभल्यांना त्याचा हेवा वाटल्यावाचून राहणार नाही. वयाच्या फक्त पाचव्या वर्षी तब्बल ४८ मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेल्या आणि सध्या इयत्ता नववीत शिकणाऱ्या या लहानग्या बुधियाच्या जीवनावर बॉलीवुडमध्ये ‘बुधिया सिंग: बॉर्न टु रन’ हा एक चरित्रपट साकारण्यात आला आहे. बुधियाचा हा ‘धावपट’ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि बालपणाकडे काहीशा बदललेल्या दृष्टीकोनाने पाहण्यासाठी ‘बुधिया सिंग: बॉर्न टु रन’ चित्रपटाच्या टिमने ‘वॉक्स पॉप’सह यूट्यूबवर एक नवा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. बालवयातच मुलांची पात्रता ओळखून त्यांत दडलेल्या कर्तृत्त्वाला आोळखा असा काहीसा संदेश हा व्हिडिओ पाहताना मिळतो.
‘लिमका बुक’ मध्येही बुधियाच्या या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणि प्रेक्षकांचे बुधियाबद्दचे कुतूहल दूर करण्यासाठी खुद्द बुधिया अवुगा सिंग काही दिवसांनी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मुंबईत येणार असल्याची माहीती सुत्रांमार्फत मिळाली. बॉलीवुडमध्ये चरित्रपटांना मिळणारे यश पाहता पाच ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या धावपटू बुधियाची ही कहाणी ‘बुधिया सिंग: बॉर्न टु रन’ तिकिट खिडक्यांवर किती धावणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jul 2016 रोजी प्रकाशित
बॉलीवुडचा नवा चरित्रपट – बुधिया सिंग: बॉर्न टु रन
बुधिया अवुगा सिंगचे कर्तृत्त्व पाहून भल्याभल्यांना त्याचा हेवा वाटेल
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-07-2016 at 16:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budhia singh will make you rethink your childhood