बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सिद्धार्थचा बहुचर्चीत आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘शेरशाह’ १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना त्यांचे अश्रू अनावर झाले असे त्यांचे म्हणणे आहे. ‘शेरशाह’ चित्रपटात विक्रम बत्रा यांचे आई वडील मुलाला शहीद होताना पाहून भावूक झाले होते.

‘क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या वडिलांनी सांगितले की, १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बॉर्डर’ हा चित्रपट विक्रम यांनी ८ वेळा पाहिला होता. विक्रम देश भक्त होते. त्यात त्यांनी बॉर्डर ८ वेळा पाहिल्याने त्या सगळ्याचा परिणाम विक्रम यांच्यावर झाला होता. त्यांना एका सैनिकाचे आयुष्य आवडले.’

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

विक्रम बत्रा यांचे वडील ‘शेरशाह’मध्ये कॅप्टनच्या शहीद झालेल्या दृश्याबद्दल म्हणाले की, ‘एक पाकिस्तानी सैनिक लपून बसला होता आणि त्याचे लक्ष विक्रमवर होते. त्यानंतर त्याने विक्रमला ३ ते ४ गोळ्या झाडल्या. तेवढ्यात विक्रम खाली पडला आणि त्याच्या तोंडातून रक्त वाहू लागले आणि तो दुर्गा माता की जय म्हणत शहीद झाला. आमच्यासाठी तो क्षण भावनिक होता.’

आणखी वाचा : ‘माधुरी दीक्षित दे, आम्ही लगेच इथून निघून जाऊ’, पाकिस्तानच्या मागणीला कॅप्टन विक्रम बत्रांनी दिले होते ‘असे’ उत्तर

तर विक्रम बत्रा यांचे भाऊ आणि आई कमल कांता बत्रा चित्रपट पाहिल्यानंतर म्हणाले, ‘जेव्हा अचानक विक्रमला गोळी लागते तेव्हा आम्ही भावूक झालो होतो. ‘शेरशाह’ या चित्रपटात सिद्धार्ध मल्होत्रा आणि कियारा आडवाणीने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात विक्रम बत्रा यांचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे.