संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या चित्रपटात ३००हून अधिक दृष्य आणि शब्दांवर सेन्सॉरने कात्री लावल्याचे म्हटले जात होते. मात्र या सर्व अफवा असून विनाकारण सेन्सॉर बोर्डावर टीका करू नये असे सेन्सॉरचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी म्हटले. चित्रपटाच्या नावासह फक्त पाच महत्त्वाचे बदल करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
करणी सेना आणि इतर काही संघटनांकडून होणारा निषेध, भन्साळी आणि दीपिकाला आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या आणि एकंदर बिघडलेली परिस्थिती पाहता ‘पद्मावत’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले होते. अखेर, सेन्सॉरने यावर तोडगा काढत पाच बदल करण्यास सांगत चित्रपटाचे शीर्षकही ‘पद्मावती’वरून ‘पद्मावत’ करण्यास सांगितले होते. या पाच बदलांमध्ये चित्रपटाचे शीर्षक, ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याची सूचना (disclaimer) काढून टाकणे, घुमर गाण्यातील काही बदल, ऐतिहासिक स्थळांचा चुकीचा/ दिशाभूल करणारा दिलेला संदर्भ दुरुस्त करणे आणि सतीच्या प्रथेचे उदात्तीकरण यातून होत नसल्याची सूचना (disclaimer)सुरुवातीला देणे यांचा समावेश आहे.
‘निर्मात्यांना सेन्सॉरच्या निर्देशांनुसार हे पाच बदल करूनच चित्रपट प्रमाणित करण्यासाठी पाठवले. त्यानुसार यु/ए प्रमाणपत्र सेन्सॉरने दिले असून ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याशिवाय अन्य काही कट्ससंदर्भातील बातम्या या फक्त अफवा आहेत. त्यामध्ये काहीच तथ्य नाही. विनाकारण सेन्सॉर बोर्डावर टीका करू नये,’ असे प्रसून जोशी यांनी स्पष्ट केले.
VIDEO : हॉलिवूड अभिनेत्याला शबाना आझमी आपल्या तालावर नाचवतात तेव्हा..
दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाची तारीख जवळ आल्याने भन्साळी आणि त्यांची संपूर्ण टीम चित्रपटाच्या अंतिम एडीटींगचे काम करत आहे. कोणत्याही अडथळ्यांशिवाय अखेर हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.