गेल्या १३ वर्षांपासून साजिरी देशपांडेला डेट करणारा अमेय सरतेशेवटी विवाहबंधनात अडकला. पुण्यातील श्रुतिमंगल कार्यालयात अमेय आणि साजिरीचा दिमाखदार विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी, सुमित राघवन, ललित प्रभाकर, जितेंद्र जोशी यांच्यासोबतच ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेला आघाडीचा अभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वीच त्याच्या लग्नाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती.
अमेयने लग्नात अबोली रंगाची शेरवानी आणि साजिरीने केशरी रंगाची साडी नेसली आहे. दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील सुव्रत जोशी, पुष्कराज चिरपुटकर, पूजा ठोंबरे, स्वानंदी टिकेकर आणि सखी गोखले लग्नाला उपस्थित होते. अमेय आणि साजिरीला आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी यावेळी अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
PHOTO : असा रंगला अमेयचा संगीत सोहळा
सोशल मीडियावर लग्नाची बातमी देताच याबद्दल अमेयच्या चाहत्यांना खूप उत्सुकता होती. अमेय- साजिरीचं हे नातं बऱ्याचजणांच्या माहितीत होतं. कारण, बऱ्याचदा अमेयसोबत साजिरीने काही कार्यक्रमांना हजेरीसुद्धा लावली होती. अमेय वाघ हे टेलिव्हीजन आणि वेब विश्वातील एक बरंच गाजलेलं नाव आहे. आपल्या अभिनयामुळे अमेयने अगदी अल्पावधीत युवापिढीच्या मनात स्थान मिळवले. नुकताच त्याची प्रमुख भूमिका असलेला ‘मुरांबा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. मराठी रंगभूमीवर त्याची भूमिका असलेले ‘अमर फोटो स्टुडिओ’ नाटकही गाजत आहे.