राजेश खन्नावरील प्रेमातून त्यांच्या काही चाहत्या चक्क आपल्या रक्ताने पत्र लिहित. यातले थ्रील सोशल साइट्सवर एखाद्या चाहत्याने एखाद्या स्टारच्या ड्रेस सेन्सचे कौतुक करण्यात किंवा त्यानेच फेसबुक/ट्विटरवर फॅन क्लब स्थापन करण्यात आहे का? अर्थात काळ बदलला, माध्यमे वाढली, अगदी प्रेम करण्याचीही पद्धत बदलली. तसंच तारे-तारकां आणि त्यांचे चाहते यांच्यातील नातेसंबंध देखील बदलले. फार पूर्वी आवडत्या कलाकाराला वाढदिवस शुभेच्छांचे पत्र पाठवणे ही प्रथा खूपच रुळल्याने मुद्रित माध्यमांत काही ठिकाणी स्टारचे वाढदिवस व पत्रे प्रसिद्ध करण्याची पद्धत होती. मोठ्या स्टारकडे पत्रांचा ढीग पडे. काही स्टार आपल्या कार्यालयातून याच चाहत्यांना आपली छापील स्वाक्षरी असणारा फोटो पाठवत. काही चाहत्यांना त्यात प्रचंड आनंद मिळत असे. चाहत्यांचे स्टारवरचे उत्स्फूर्त प्रेम ही सर्वकालीन उत्कट परंपरा आहे. त्यात विविधतापूर्ण आनंद आहे. आवडत्या कलाकाराच्या अगदी दुरुन दर्शनापासून त्या कलाकाराला जेमतेम स्पर्श होईपर्यंत त्यात अनेक लहान मोठ्या गोष्टी आहेत. फेसबुक/ ट्विटर/ ऑर्कुट/ यूट्यूब/ इन्स्टा यांच्या काळात हेच प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बदलली. तरीही प्रत्यक्षात आपला आवडता स्टार दिसावाच ही ओढ कायम आहे. त्यात भावनिक ओढ/ मानसिक आनंद/ आयुष्यभरची आठवण ही भावना असावी. हे जास्तच ‘लाईव्ह’ आहे. मोबाईल काळात असा स्टार दिसला रे दिसला त्याच्यासोबत सेल्फी काढायचाच आणि फेसबुकवर टाकायचा ही घाई आता जणू सवयच झाली आहे. पण सोशल नेटवर्किंग साइटवर याच स्टार्सना असणारे फॉलोअर्स ही नवीन संस्कृती वेगाने फोफावते आहे. यातही अमिताभ बच्चन नंबर वनवर. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स त्यालाच आहेत. आणि दररोजच तो आपल्याबाबतची माहिती/आठवण/ फोटो शेअर करतो. यासाठी लागणारा वेळ/ सातत्य/स्वभाव/ओढ त्याच्याकडे आहे. यामुळे तो नवीन पिढीशी जोडला गेलाय आणि त्याच्या ट्विस्टच्या बातम्याही होतात. त्याच्या काही चाहत्यांचीही ट्विटर अकाउंट आहेत. तीदेखील बिग बींच्या कोणत्या चित्रपटाला चाळीस/ पंचेचाळीस वर्षे झालीत याची फोटोसह माहिती देतात. त्यातून बिग बींचे सतत या सोशल मीडियात अस्तित्व जाणवते. त्याच्याशी फारशी कोणाची स्पर्धा नाही. त्याला या माध्यमातून नवीन पिढीचे चाहते लाभलेत. कमल हसनपासून स्वप्नील जोशीपर्यंत आणि माधुरी दीक्षितपासून अमृता खानविलकरपर्यंत अनेक स्टार सोशल नेटवर्किंग साइटवर कार्यरत आहेत. प्रत्येकाचे फॉलोअर्स वाढताहेत आणि त्यानुसार या स्टारचा फॉलोअप देखील आहे. अगदी आपल्या नवीन चित्रपटाच्या टीझरपासून घरच्या गणपतीच्या फोटोपर्यंत ते पोस्ट करतात. कमल हसन सामाजिक सांस्कृतिक राजकीय संदर्भात पोस्ट करतो ती देखील तमिळ भाषेत हे विशेषच उल्लेखनीय आहे. सई ताह्मणकरने पुण्यात आपण गणेश दर्शनासाठी चाललोय या प्रवासाचे छोटेसे फूटेजही पोस्ट केले. त्यालाही रिट्वीट व लाईक्स मिळणे म्हणजेच चाहते जोडले गेलेत व त्यांनीही हे नवीन माध्यमातून स्टारवर प्रेम करणे स्वीकारल आहे. डिजिटल युगाचा मोठाच लाईव्ह प्रत्यय यात येतोय. अमृता खानविलकर आणि सोनाली कुलकर्णी (पोस्टर गर्ल) यांच्यात सर्वाधिक फॉलोअर्स कोणाचे आहेत, असा एकाने प्रश्न करताच मी उत्तर दिले, असा प्रश्न पडलाय म्हणजेच त्यांना या मीडियात स्पेस सापडलीये व त्या योग्य दिशेनेच जाताहेत असाच होतो. फॅन/ फॉलोअर्स ही प्रत्येक स्टारची पहिली भूक असते म्हणून तर कित्येक कलाकार आपल्या पहिल्या स्वाक्षरीचा अनुभव कधीच विसरत नाहीत.
स्टारने आपली प्रत्येक छोटी गोष्ट फेसबुक/ ट्विटरवर पोस्ट करून मीडिया व फॉलोअर्स यांच्याशी कनेक्ट राहायला हवेच का अथवा सोशल नेटवर्किंग साइटवरील स्टारच्या पोस्ट पुन्हा वेगळी बातमी कशी ठरेल असे प्रश्न अधूनमधून चर्चेत असतात. पण स्टारने नवीन गाडी घेतलीय यापासून तो देशविदेशात कुठे बरे भटकंतीला गेलाय या प्रत्येकाला ‘न्यूज व्हॅल्यू’ असल्यानेच त्या पोस्ट ही गरज आहेच. स्टारची जवळपास कोणतीच गोष्ट खासगी राहत नाही, याची सवय याच स्टार्सनी लावलीये की गॉसिप्स/ग्लॅमर वृत्तीने हा प्रश्नच आहे आणि डिजिटल माध्यमा पलीकडेही खूपच मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्यापर्यंत स्टारच्या घडामोडी पोहोचायला हव्यात. सध्या एक महत्त्वपूर्ण नवीन गोष्ट पुढे येतेय. ती म्हणजेच सोशल नेटवर्किंग साइटवरील फॉलोअर्सइतकेही प्रेक्षक चित्रपटगृहात का लाभत नाहीत? हे फॉलोअर्स त्या स्टारच्या लूक व स्टाइलवर फिदा आहेत. चित्रपट पाहणे ही गोष्ट तेथे येत नाही ? की चित्रपट चालवणारा वर्ग वेगळाच आहे? तो अजूनही फारसा सोशल साइट्सवर कनेक्टेड नाही? अमिताभच्या फॉलोअर्सनी ‘सरकारराज 3’ एकदा पाहिला असता तरी तो सुपर हिट चित्रपट ठरला असता. पण सोशल साइटवर फॉलोअर्स असणे वेगळे व चित्रपटाला त्याच्या क्लासप्रमाणे स्वीकारणे/ नाकारणे वेगळे अशीच या फॉलोअर्सची मानसिकता/ दृष्टिकोन दिसतोय. राजेश खन्नादेखील यातून सुटला नाही. त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरण स्थळावर प्रचंड गर्दी होई पण म्हणून प्रेम कहानी, मेहबूबा या चित्रपटाना त्यानी स्वीकारले नाही. सलमान खान, शाहरुख खान यांच्या बंगल्याबाहेरची ‘फॅन्स’ची गर्दी हे प्रेम वेगळे आणि त्यांच्या ‘ट्यूबलाइट’, ‘जब हॅरी मेट सेजल’ला नाकारणे वेगळाच विषय. सोशल नेटवर्किंग साइटवरील वाढत्या फॉलोअर्सबाबतही तेच म्हणायचे काय? की या प्रेमाचा स्वीकार करून स्टार्सनी आपल्या पोस्टचे प्रमाण व उत्साह वाढवावा? तेच टॉनिक ठरतंय तर तेच करावे कारण तेच टॉनिक चित्रपटात भूमिका करण्यास शक्ती देते.
चाहते असो अथवा फॉलोअर्स कधी कधी त्यांच्या प्रेमाचा अतिरेक/ अतिउत्साह होतोच. जुहूच्या रस्त्यावर ‘नाचे नागिन गली गली’च्या गाण्याचे चित्रीकरण असतानाच अशाच एका चाहत्याचा संयम सुटला आणि त्याने चक्क मीनाक्षी शेषाद्रीला अशोभनीय पद्धतीने पकडले. या अनपेक्षित अनुभवाने ती प्रचंड हादरली आणि दोन तीन दिवस शूटिंग करु न शकल्याचे वृत्त गाजले. नेहा पेंडसेलाही सोशल साइटवर वात्रट/अश्लील कॉमेन्टसचा मानसिक त्रास झाल्याचे मध्यंतरी वृत्त होते. अनेकदा तरी या अभिनेत्रींना सोशल साइटवर भलतीसलती विचारणा वा प्रश्न होतात. त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या पोस्ट टाकत राहणेच योग्य असले तरी याबाबत सतत एक अनामिक दबाव राहू शकतो. सार्वजनिक स्थळावरील अवाजवी गर्दीतून संरक्षण द्यायला पोलीस वा बाऊन्सर आहेत, तसे सोशल साइटवर बचाव कार्य कोण करणार? वाढती माध्यमे एक्स्पोजर वाढवणारी व चाहत्यांशी थेट नाते जोडणारी असली तरी आपले फॉलोअर्स ठरवायचा अथवा त्यांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार कोणत्याच कलाकाराकडे नाही. पण अधिकाधिक फॉलोअर्स अनेक स्टारचा उत्साह वाढवतो. काय सांगावे एखादी अभिनेत्री, माझेच फॉलोअर्स सर्वात जास्त हे टेचात सांगेलही. स्पर्धेच्या युगात ही भावना विलक्षण प्रबळ होणारी आहे. हा या सार्याचा वेगळाच पैलू ठरावा…
– दिलीप ठाकूर