सोशल मीडियाच्या जगात माणसांमधील अंतर बरंच कमी झालं आहे, असं म्हणण्यास हरकत नाही. कधी कधी सोशल मीडियामुळे बराच त्रासही सहन करावा लागतो. याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. पण, या माध्यमांमुळे अनेक जणांना त्यांचे जुने मित्र-मैत्रिण शोधण्यासही उपयोग होतो. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असलात तरी फेसबुक, ट्विटरवरून तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधू शकता. वर्षानुवर्षे आपण एखाद्या व्यक्तीला भेटत नाही. नंतर तीच व्यक्ती अचानक फेसबुकच्या माध्यातून तुम्हाला भेटते तेव्हा….. या ‘तेव्हा’नंतरची स्टोरी अभिनेता अक्षय वाघमारेच्या आयुष्यात घडलीये. अचानक त्याच्या आयुष्यातून गायब झालेली ती मुलगी काही वर्षांनंतर त्याला फेसबुकवर भेटल्याचे अक्षयनेच स्वतः सांगितले.

मी सहावीत असताना एक मुलगी माझ्या वर्गात होती. आम्ही दोघंही बेंचवर शेजारीच बसायचो. सहावीत असताना तिने आमच्या शाळेत प्रवेश घेतला होता. त्यानंतर सातवीला गेल्यानंतर तिने आमची शाळा सोडली. ती मला खूप आवडायची. एखादी व्यक्ती तुम्हाला आवडते आणि ती तुमच्या शेजारीच बसते, असं असताना एके दिवशी तिने येणं बंद केल्यावर जी हालत होते अगदी तशीच स्थिती माझीही तेव्हा झाली होती. त्यानंतर तब्बल वीस वर्षांनंतर ती मला भेटली. पण, तेव्हा तिचं लग्न झालं होतं. आताही आम्ही चांगले मित्रमैत्रिण आहोत. तिचा नवरा तर आता माझा बेस्ट फ्रेंड आहे.

सोशल मीडिया एक असं माध्यमं आहे जे तुम्हाला दूर झालेल्या माणसांशी जोडायला मदत करतं. फेसबुकमुळे दोन वर्षांपूर्वी आमची भेट झाली. मी गेले कित्येक वर्षे तिला फेसबुक, ऑर्कुटवर शोधत होतो आणि त्याचवेळी तीसुद्धा मला सोशल मीडियावर शोधत होती. माझं खरं नाव वेगळं आहे आणि मी इंडस्ट्रीत वेगळं नाव लावतो. माझं खरं नाव अमोल वाघमारे. त्यामुळे मला सोशल मीडियावर शोधणं तिला खूप कठीण गेलं, असं तिने मला भेटल्यावर सांगितलं. आमच्या दोघांची एक मैत्रिण आहे तिच्याकडून तिला माझं आताच नाव कळलं. त्यानंतर तिनेच मला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मग आमची भेट झाली आणि एकमेकांच्या घरीही गेलो. तेव्हा मला कळलं की, तिच्या वडिलांची महाराष्ट्राबाहेर बदली झाल्यामुळे तिला शाळा सोडावी लागली होती. आता तिचं लग्न झालं असून ती बारामतीला स्थायिक आहे. मीसुद्धा मूळचा बारामतीचा आहे पण आता पुण्यात राहतो. तिच्या नवऱ्याची खूप मोठी शेती आहे. त्यामुळे मी कधी बारामतीला गेलो की तिच्या शेतावर नक्की जेवायला जातो. तिचा नवरा आता माझा जवळचा मित्र बनल्याने आमच्या बऱ्याच गप्पागोष्टी होतात. मुळात आम्ही वेगवेळ्या क्षेत्रातले असल्यामुळे आमच्याकडे बोलण्यासाठी खूप विषय असतात. ती लोकं कधी पुण्यात आली तर मला भेटतात आणि मग आमची गप्पांची मैफल रंगते.

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com