‘तुमच्यासाठी काय पण’ या एका ओळीने प्रसिद्ध झालेला ‘देवयानी’ या मालिकेतील ‘बाजी’ तुम्हाला आठवतोय का? आपल्या आईला काही झालं तर समोरच्याचा जीव घ्यायला तयार असणारा ‘एक्का’ म्हणजेच विवेक सांगळे सध्या ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेत ‘राघव’ची भूमिका साकारत आहे. दोन व्यक्तींमध्ये प्रेम जुळवून आणण्यासाठी प्रेमाचे फंडे देणारा ‘राघव बाबा’ सध्या तरुणाईत चांगलाच प्रसिद्ध आहे. हरफन मौला तसेच आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने जगणाऱ्या ‘राघव’प्रमाणेच विवेक आहे. मालिकेत लव्ह गुरुची भूमिका साकारणाऱ्या विवेकची खऱ्या आयुष्यातील लव्ह लाइफ कशी असेल हे जाणून घेण्याची इच्छा त्याच्या चाहत्यांना नक्कीच असेल. त्यामुळे याबद्दलचा अनुभव खुद्द विवेककडूनच आपण जाणून घेऊया.
अभिनय क्षेत्राकडे वळण्यापूर्वी विवेक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. मात्र, अभ्यासात फारसा रस नसल्याने तो ड्रॉप आउट झाला होता. तीनपेक्षा जास्त विषय सुटल्याने त्याला एक वर्षाचा गॅप घ्यावा लागला. मात्र, काही झाले तरी शिक्षण पूर्ण करायचे हा एकमेव ध्यास मनात ठेवून तो नेहमी कॉलेजला जायचा. विवेक तेव्हा कॉलेजला जात असला तरी त्याचे इतर उपदव्याप सुरु होतेच. एके दिवशी तर त्याने मित्रांसोबत चक्क मुलीला पटवण्याची पैज लावली होती. याविषयी विवेक म्हणाला की, इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करताना मी वर्गात कमी आणि कॅम्पसमध्येच जास्त असायचो. तेव्हा मला ड्रॉप आला होता तरीही मी रोज कॉलेजला जायचो. कॉलेजमध्ये आमचा खूप मोठा ग्रुप होता. त्यामुळे आमची बरीच मजा-मस्ती चालायची. त्यावेळी फर्स्ट इयरची नवी बॅच आली होती. त्या बॅचमधल्या मुलीला पटवण्याची आमची पैज लागली. मला तसाही काही कामधंदा नव्हता त्यामुळे मी ती पैज मान्य केली. त्यानंतर त्या मुलीची सर्व माहिती काढण्याच्या कामाला आम्ही लागलो. एक-दोनदा मी तिच्याशी बोललोसुद्धा. एके दिवशी असं झालं की, आमची सात-आठ जणांची गँग प्रॅक्टीकल रुमबाहेर तिची वाट बघत थांबलो होती. खरंतर कॉलेजबाहेर पडण्यासाठीचे बरेच रस्ते होते. पण ती नेहमी याच रस्त्याने जाते अशी माहिती मिळाल्याने आम्ही त्या ठिकाणी तिची वाट पाहत थांबलो. त्याचवेळी मला कळलं ती दुसऱ्या कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहे. पण ही माहिती शंभर टक्के खरी नसल्याने काही झालं तरी आज तिला विचाराचंच असं मी ठरवलं.
बराच वेळ झाला, तिची जाण्याची वेळही निघून गेली तरी ती आम्हाला जाताना दिसली नाही. माझे दोन मित्र प्रॅक्टिकल रुममध्ये जाऊन आले तर ती तिथूनही गेली होती. तेव्हाच एकाने फोन करून ती बसस्टॉपवर असल्याचं सांगितलं. त्यानंतर आम्ही सगळेच धावत बसस्टॉपवर गेलो. बाहेर आलो तर ती तिथेही नव्हती. ही गेली तरी कुठे…. पैज लागल्याने आज काहीही करून मला तिला विचारायचंच होतं. आम्ही तेथे पोहचलो तेव्हा एक बस नुकतीच निघत होती. त्यात ती असेल या विचाराने मी मध्येच रस्त्यात उभं राहून बस थांबवली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ती त्या बसमध्ये नव्हतीच. तेवढ्यात एक मित्र आला आणि ओरडला, ‘अरे वो यहा पे नही है, वहा सामने थम्स अप पी रही है.’ शेवटी मी पुन्हा खाली उतरलो आणि माझ्या मनातल्या भावना तिला सांगितल्या. त्यानंतर आमची मैत्री झाली. मी अनेकदा तिच्यासाठी माझे पेपर बुडवले. माझ्यानंतर तिची परीक्षा असल्याने केवळ तिला बघण्यासाठी मी पेपर बुडवायचो. पण, आमचं अफेअर कधीच नाही झालं. त्यामुळे माझं हे क्रश तसं अर्धवटच राहिलं.
चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com