छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी त्याने अखरेचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या झटक्याने सिद्धार्थचे निधन झाल्याची माहिती कूपर रुग्णालयाने दिली आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहे.

सिद्धार्थच्या निधनाची बातमी ऐकून बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनला धक्का बसला आहे. तिने ‘माझा या बातमीवर विश्वासच बसत नाहीये. मला आशा आहे की ही बातमी खोटी असेल. तो खूप यशस्वी आणि मेहनती अभिनेता होता. तो तरुण होता’ या आशयाचे ट्वीट केले आहे.

अभिनेता मनोज वाजपेयीने ट्वीट करत सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली आहे. ‘हे धक्कादायक आहे. माझा यावर विश्वासच बसत नाही. त्याच्या आत्म्याला शांती मिळो’ या आशयाचे ट्वीट त्याने केले आहे. अभिनेता कपिल शर्माने देखील ट्विटरद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली आहे.

१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८मध्ये त्याने बाबुल का आंगन छूटे या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली. त्याने रिअॅलिटी शो बिग बॉस १३मध्ये सहभाग घेतला होता आणि त्या सिझनचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर त्याने खतरों के खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता.