बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीचे वडील वी.के. जेटली यांचे निधन झाले आहे. सेलिना दुबईमध्ये आपल्या पती आणि मुलांसह सुट्ट्यांचा आनंद घेत होती. दीर्घ आजाराने तिच्या वडिलांचं दोन जुलै रोजी निधन झालं आणि दुबईहून सेलिनाला भारतात परतावे लागले आहे. वडिलांच्या स्वास्थाविषयी फार काही माहिती न देता पीटीआयशी बोलताना ती म्हणाली की, ‘त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्काच बसला.’
गेल्या वर्षी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त तिने त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोसोबत कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं की, ‘सुपरहिरो हे लाखोंमध्ये एक असतात. तुमच्यासारखे बाबा आयुष्यात एकदाच मिळतात. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!’
वडिलांच्या निधनामुळे भारतात परतलेली सेलिना आता काही दिवस इथेच वास्तव्यास आहे असं म्हटलं जात आहे. सध्या ती गरोदर असून याआधी विन्स्टन आणि विराज अशी दोन मुले आहेत. ऑक्टोबरमध्ये ती पुन्हा एकदा जुळ्यांना जन्म देणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी सेलिनाने इशा देओलसह एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. इशा देओलसुद्धा गरोदर आहे.
वाचा : …या सेलिब्रिटी जोडप्यांच्या घरी होणार नव्या पाहुण्यांचे आगमन
काही दिवसांपूर्वी पुन्हा गरोदर असण्याविषयी सांगताना, पुन्हा जुळी मुलं होणार असल्याचं कळताच आम्हाला धक्का बसला, असं सेलिना म्हणाली. ‘डॉक्टर अल्ट्रासाऊंड करत असतानाच पीटरने त्यांना विचारलं की यावेळीसुद्धा जुळीच मुलं आहेत का? त्यावर डॉक्टर हो म्हणाले. ते ‘हो’ म्हणताच आम्हा दोघांनाही धक्काच बसला’, असं ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सेलिनाने सांगितले. ‘त्यावेळी आमच्या मनात आलेली पहिली गोष्ट अशी होती की, या मुलांच्या पालकत्वासाठी देवानेच आमची निवड केली आहे’, असंही सेलिना म्हणाली.