अभिनेत्री सेलिना जेटलीने नुकतेच जुळ्या मुलांना जन्म दिला, मात्र काही वेळातच तिच्या या आनंदावर विरजण पडले. एकीकडे जुळ्या मुलांना जन्म देण्याचा आनंद असतानाच एका मुलाला गमावण्याचे दु:खही तिला सहन करावे लागत आहे. तिचे एक बाळ हृदयाच्या समस्येमुळे फार काळ जगू शकले नाही. सेलिनाने पाच वर्षांपूर्वी व्हिस्टन आणि विराज या जुळ्या मुलांना जन्म दिलेला. त्यानंतर या वर्षी ती पुन्हा गरोदर राहिली. १० सप्टेंबर रोजी दुबईत तिने आर्थर आणि शमशेर या जुळ्या मुलांना जन्म दिला. शमशेरला जन्मापासूनच हृद्याशी संबंधित समस्या होती आणि त्यामुळेच तो फार काळ जगू शकला नाही.

यासंदर्भातील माहिती सेलिनाने स्वत: फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. ‘शमशेर जरी फार काळ जगू शकला नसला तरी आर्थरच्या रुपात त्याचा अंश नेहमीच माझ्यासोबत राहणार आहे. आर्थर हुबेहूब शमशेरसारखा दिसतो,’ असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

वाचा : आदित्य पांचोलीच्या नोटिशीला कंगनाचे उत्तर 

मागील दोन महिन्यांचा काळ हा सेलिनासाठी अत्यंत चढउतारांचा होता असेही तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. यासंदर्भात तिने पुढे लिहिले की, ‘जुलैमध्ये माझे वडील वी.के.जेटली यांना मी गमावले आणि त्यानंतर आता शमशेरला, त्यामुळे हा काळ माझ्यासाठी अत्यंत दु:खद आहे. मात्र त्यातही एक आशेचा किरण आहे, तो म्हणजे माझा मुलगा आर्थर.’