सुपरहिरो ‘ब्लॅक पँथर’ फेम अभिनेता चॅडविक बोसमन याचं निधन झालं आहे. तो केवळ ४३ वर्षांचा होता. बोसमन गेल्या चार वर्षांपासून कर्करोगामुळे त्रस्त होता. अखेर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. चॅडविकच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. दरम्यान त्याच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेलं शेवटचं ट्विट सध्या जोरदार चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हे ट्विट ट्विटरच्या इतिहासातील सर्वाधिक लाईक मिळवणारं ट्विट ठरलं आहे.

ट्विटरने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत ही माहिती दिली. चॅडविकच्या या ट्विटला आतापर्यंत ६७ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच २३ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जगभरातील लाखो चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉसमन याने लॉस एंजलिस येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्याची पत्नी आणि कुटुंबातील अन्य सदस्य त्याच्या सोबत होते. बोसमन हा कोलोन कॅन्सरने त्रस्त होता. “ते खरंच एक लढवैय्ये होते. चॅडविक यांनी संघर्षाच्या काळातही प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांसाठी केला. या चित्रपटांवर प्रेक्षकांनीही भरभरुन प्रेम केलं. गेल्या चार वर्षांमध्ये बोसमन यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. विशेष म्हणजे या काळात त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरु होती”, असं बोसमन यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चॅडविक बोसमन हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता होता. ‘किंग ऑफ वकांडा – ब्लॅक पँथर’ या सुपरहिरो व्यक्तिरेखेमुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार देखील पटकावला होता. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना चॅडविकचं निधन झालं. परिणामी चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.