टॉलिवूडमधील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा बहुप्रतिक्षित विवाहसोहळा काल संध्याकाळी पार पडला. गोव्यात हिंदू विवाहपद्धतीनुसार या दोघांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. सम आणि चै म्हणजेच ‘चैसम’ नावाने हे प्रेमीयुगूल प्रसिद्ध आहे. तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनीची सून झालेल्या समंथाबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात.
समंथाचा जन्म चेन्नईत झाला असून वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी राहिलेल्या या अभिनेत्रीने तेथीलच मॅरिस महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या समंथाने नंतर चित्रपटसृष्टीची वाट धरली.
गौतम मेननच्या ‘ये माया छेसावे’ने तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. विशेष म्हणजे या चित्रपटात तिच्या हिरोची भूमिका नागा चैतन्यनेच केली होती. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या चित्रपटाचा नंतर ‘विन्नै थंदी वरुवाया’ हा तमिळ रिमेक आला. यात समंथाने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारलेली. यानंतर ती ‘बाना कथाडी’ आणि ‘मोस्कोविन कावेरी’ या चित्रपटांमध्येही झळकली.
PHOTOS : गोव्यात नागा चैतन्य-समंथाचा विवाह संपन्न
समंथाला आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवण्यासाठी महेश बाबूचा ‘डुकाडू’ हा चित्रपट महत्त्वाचा ठरला. चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीला एस एस राजामौलीच्या ‘एगा’ने (तमिळमध्ये ‘नान ए’) तेलगू चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारुपास आणले. अभिनेता नानीच्या तोडीस तोड भूमिका करण्याची संधी यात समंथाला मिळाली. दोन भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
‘येतो वेल्लीपोयनिधी मनसु’ या २०१२ साली आलेल्या द्विभाषिक चित्रपटाने तिकीट बारीवर फारशी कमाल केली नाही. मात्र, यातील समंथाच्या अभिनयाची बरीच प्रशंसा करण्यात आली. त्यानंतर पुढची दोन वर्षे तिने एकाही तमिळ चित्रपटात काम केले नाही. त्यावेळी तिने ‘रमैय्या वस्तावैया’वर लक्ष केंद्रित करत काही चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराच्याच भूमिका साकारण्यास प्राधान्य दिले.
PHOTOS : नागा चैतन्य – समंथा रुथ प्रभूची मेहंदी सेरेमनी
‘मनम’ हा समंथाच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा चित्रपट ठरला. यात अक्किनेनी कुटुंबातील अक्किनेनी नागास्वरा राव, नागार्जुन, नागा चैतन्य, अखिल अक्किनेनी यांच्या मुख्य भूमिका होत्या. तेव्हा हिट ठरलेल्या या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले.
‘मनम’नंतर समंथाने व्यावसायिक चित्रपटांना प्राधान्य देत ‘अंजान’ या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले. तेलगू चित्रपटसृष्टीत भक्कम स्थान असलेल्या या अभिनेत्रीने विजय, विक्रम, सुरिया आणि धनुष यांसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत रुपेरी पडद्यावर भूमिका साकारल्या आहेत.
नागा चैतन्यशी लग्न झाल्यानंतर समंथा तिचे काम सुरुच ठेवणार असून, तिच्या हातात सध्या काही मोठे चित्रपट आहेत.