झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. या कार्यक्रमातील कलाकारांना केवळ देशातच नाही तर विदेशातही लोकप्रियता मिळत आहे. भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या कलाकारांनी त्यांच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. विशेष म्हणजे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या कलाकारांपैकी एक विनोदवीर लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे.  आतापर्यंत आपल्या विनोदाने प्रेक्षकांना हसविणारा विनोदवीर कुशल बद्रिके लवकरच मानस कुमार दास दिग्दर्शित ‘झोलझाल’ या चित्रपटात झळकणार आहे. मात्र या चित्रपटात तो खलनायकाच्या रुपात झळकणार आहे. त्यामुळे त्याला या नव्या रुपात पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत.

कुशलने आतापर्यंत काही मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र या चित्रपटांमधून त्याने त्याच्या अभिनयाची नवीन बाजू प्रत्येक वेळी उलगडली आहे. यावेळीदेखील असंच काहीसं पाहायला मिळणार आहे. ‘झोलझाल’मध्ये तो चक्क खलनायकाच्या रुपात झळकणार आहे.मात्र या खलनायकाला विनोदाची साथ लाभली आहे. ‘डॉन दादाऊद कैउद्रे’ असे कुशलच्या भूमिकेचे नाव आहे. या डॉनला, डॉन होण्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था हवी असून त्यासाठी त्याला एक बंगलाही हवा आहे. त्यामुळेच हा बंगला मिळविण्यासाठी तो काय काय झोलझाल करतो हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
कुशल साकारत असलेला ‘डॉन दादाऊद कैउद्रे’हा अमजद खानचा फॅन असल्याने त्याने परिधान केलेली वेशभूषा अमजद खान यांच्या शोले, कुर्बानी, दादा आणि इन्कार या चित्रपटातील वेषभूषेशी मिळतीजुळती आहे. या चित्रपटात कुशलने अमजद खान यांचा आवाज न काढता ना त्यांची नक्कल करता एक वेगळाच अमजद खान आपल्या समोर साकारण्याचा प्रयत्न केला आहे.

वाचा : Video : मी सिनेसृष्टीत जातीयवाद अनुभवलेला नाही – विक्रम गोखले

“हा चित्रपट माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांचे नाव ऐकून माझ्या मनात जरा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र चित्रपट करताना तो गोंधळ पूर्णपणे दूर झाला, मराठी नसूनही इतक्या सहजपणे हा मराठी चित्रपट दिग्दर्शित करणं ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. माझी भूमिका जरी अमजद खान यांच्यावर प्रेरित असली तरी मी कुठेही त्यांना कॉपी केले नाही. मी माझा एक वेगळा अमजद खान प्रेक्षकांना दाखवणार आहे. हा चित्रपट करताना मला अजून एक जाणीव झाली ती म्हणजे, मराठी चित्रपट आणि अमराठी निर्माते, तंत्रज्ञ यांचं नातं घट्ट होत चाललं आहे. मराठी सिनेमाविषयीचे या अमराठी लोकांचे प्रेम हे वाढत आहे. ही आपल्या सर्व मराठी लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे,” असं कुशल म्हणाला.

वाचा : तब्बल ४० वर्षानंतर ‘या’ अभिनेत्रीचं मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन

‘झोलझाल’ हा चित्रपटाचे कथानक एका बंगल्याभोवती फिरत असून हा चित्रपटात कुशल सोबतच मराठी चित्रपट सृष्टीचे या अनेक मोठे कलाकार आहेत. ‘झोलझाल’ या चित्रपटाची निर्मिती गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता आणि संजना जी.अग्रवाल यांनी केली असून, सारिका ए. गुप्ता, विनय अग्रवाल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर रश्मी अग्रवाल, स्वप्नील गुप्ता यांनी क्रिएटिव्ह प्रोड्युसर काम पाहिले असून अमोल कांगणे, आर्णव शिरसाट सहयोगी निर्माता आहेत.या चित्रपटाचे नजीब खान हे छायाचित्रकार आहेत.या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता शिवाजी डावखर असून मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहे. ‘झोलझाल’ हा सिनेमा येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.