अनेकदा उंचीवरून, वर्णावरून, दिसण्यावरून एखाद्याची खिल्ली उडवली जाते. काहींसाठी जरी हा चेष्टेचा विषय असला तरी संबंधित व्यक्तीच्या मनावर त्याचा काय परिणाम होतो याचा विचार सहसा केला जात नाही. ‘आता माझ्या भावना दुखावणार नाहीत. कारण त्या आता दुखावून दुखावून बोथट झाल्या आहेत’, अशा आशयाची मन हेलावणारी कविता अभिनेता अंकुर वाढावेने लिहिली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अंकुरने फेसबुकवर ही कविता पोस्ट केली आहे.
सगळ्यांच्या भावनांचा आदर ठेवून माझ्या स्वतःच्या भावना व्यक्त करतोय. माझ्यामुळे भावना दुखावलेल्यांची जाहीर माफी मागतो, असं म्हणत त्याने ‘भावना’ असं शीर्षक असलेली कविता पोस्ट केली. या कवितेच्या माध्यमातून अंकुरने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात अगदी कमी वेळेत अंकुर चाहत्यांच्या पसंतीस उतरला. अंकुर वाढवे हा जसा एक चांगला अभिनेता आहे, तसाच तो एक उत्तम कवीही आहे. त्याच्या या कवितेला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. शारीरिक मर्यादांवर मात करत अंकुरने आपले अभिनय कौशल्य नेहमीच सिद्ध केले. त्याच्या याच अभिनयाचे अनेक दिग्गज अभिनेत्यांनीही कौतुक केले आहे. डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे या विनोदी कलाकारांसह अंकुरने देखील आपल्या वेगळ्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.