‘कसे आहात मंडळी, हसताय ना.. हसायलाच पाहिजे..’ असे म्हणत गेली तीन वर्षे ‘चला हवा येऊ द्या’ची टीम संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करत आलीय. मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा आणि सोबतीला मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रसिद्धीचे एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम अवघ्या काही दिवसांतच घराघरांत लोकप्रिय झाला. थुकरटवाडी गावातील भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, निलेश साबळे ही अतरंगी मंडळी सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० ला प्रेक्षकांच्या भेटीस येतात आणि पुढचा एक तास निखळ मनोरंजन करणार याची जणू खात्रीच देतात. मात्र, आता हा हास्यडोस बंद होणार आहे. तुम्हा सर्वांचा आवडता ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

वाचा : ड्रायव्हरला १२ लाखांची गाडी गिफ्ट करणाऱ्या अनुष्काची संपत्ती माहितीये?

‘चला हवा येऊ द्या’ची भुरळ मराठी मनोरंजनसृष्टी इतकीच बॉलिवूडलाही पडल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, रितेश देशमुख, इरफान खान, जॉन अब्राहम, रविना, नाना पाटेकर, विद्या बालन हे ‘चला हवा येऊ द्या’चे जबरदस्त फॅन झाले. अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाची शान अधिकच वाढवली. कालच्या भागात कार्यक्रमाचा सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळेने स्वतःच आता थोडसं थांबण्याची वेळ आल्याचे सांगितले. मात्र, ही विश्रांती काही दिवसांची असणार आहे. काहीतरी नवं करण्यासाठी हा काही क्षणांचा दुरावा असल्याचेही त्याने सांगितले.

वाचा : सेलिब्रिटींना ‘आयफोन एक्स’ची भुरळ

‘चला हवा येऊ द्या’च्या जागी ‘सा रे ग म प’ हा नवीन कार्यक्रम सुरु होणार आहे. त्यामुळे थुकरटवाडीतील विनोदांमध्ये लोटपोट होण्याचा हा आजचा शेवटचा दिवस असणार आहे.