मराठी टेलिव्हिजन विश्वात काही गाजलेल्या कार्यक्रमामंमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचं नाव अग्रस्थानी येतं. विविध संकल्पनाच्या आधारे आजवर विनोदाची परिभाषा बदलणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आता चक्क वन्य प्राण्यांचीही एन्ट्री झाली आहे. हे वन्य प्राणी कोणी दुसरे- तिसरे कोणीही नसून थुकरटवाडीतील धम्माल रहिवासीच आहेत. भाऊ कदम, भारत गणेशपुरे, निलेश साबळे, श्रेया बुगडे या कलाकारांच्या साथीने आता प्रेक्षकांना थुरासिक पार्कची सफर घडवणार आहे.
थुकरटवाडीत काही ना काही हास्यास्पद घटना घडतच असतात. त्यातही महाराष्ट्र दौरा, भारत दौरा या संकल्पनांमुळे सुद्धा प्रेक्षकांना एका वेगळ्याच विनोदी प्रवासाची झलक पाहायला मिळाली होती. आता यामध्येच एका नव्या आणि कधीही न पाहिलेल्या विश्वाचे साक्षीदार होण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या भागात विनोदवीर प्रेक्षकांना थुरासिक पार्कला नेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
याच थुरासिक पार्कमध्ये येणारे हे प्राणी नेमकी कशी तयारी करत आहेत याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये भाऊ कदम आणि सहकलाकार सराव करताना दिसत आहेत. यामध्ये रणबीरच्या ‘रे कबीरा मान जा..’ या गाण्याला एक वेगळा टच देत भाऊ चक्क ‘रे बगिरा मान जा’ असं गाणं म्हणताना दिसतोय. तर, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिकेसुद्धा चेहऱ्यावरील मेकअपमुळे ओळखू येत नाहीत. ‘ज्युरासिक पार्क’, ‘जंगलबुक’मधील पात्र पाहता थुकरटवाडीवरही त्याचा चांगलाच प्रभाव पाहायला मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ज्युरासिक पार्कच्या धर्तीवर सजलेल्या या ‘थुरासिक पार्क’मधील प्राण्यांची झलक पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.