झी मराठीवर गाजलेल्या चला हवा येऊद्या या विनोदी मालिकेतील ‘पत्रास कारण की..’ हा भागही लोकांना भावला. एखादा विषय किंवा व्यक्ती घेऊन पत्र लिहिले जात असे. त्याचे वाचन पोस्टमनकाकांचा रोल करणारा सागर करंडे हा अभिनेता करतो. तर पत्राचे लेखन लेखक अरविंद जगताप यांनी केले आहे. आता याच सगळ्या पत्रांमधी निवडक पत्रांचे पुस्तक प्रकाशित होणार आहे. २५ डिसेंबर रोजी म्हणजे सोमवारी संध्याकाळी दादर येथील किर्ती कॉलेजमध्ये हा सोहळा रंगणार आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला चला हवा येऊ द्याचा सूत्रसंचालक निलेश साबळे, संजय जाधव आणि सयाजी शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. दुष्काळ, स्त्रियांचे प्रश्न यासारख्या सामाजिक विषयासह नाना पाटेकर, सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे यांना देखील अरविंद जगताप यांनी पत्रे पाठवली होती. या कार्यक्रमातील निवडक पत्रांचे पुस्तक छापण्यात आले आहे. ग्रंथाली प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
लेखक आणि नाटककार प्रल्हाद जाधव यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. पुस्तकातील साहित्यावर अनेक मालिका, चित्रपट तयार झाले आहेत. मात्र पहिल्यांदाच दूरचित्रवाणी वरील मालिकेत वाचलेली पत्रे पुस्तकरुपात येत आहेत. महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षकांनी या पत्रांचे पुस्तक असावे अशी मागणी केली होती. त्यामुळे हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. आता वाचक याला कसा प्रतिसाद देतात हे पहावं लागेल असे मत लेखक अरविंद जगताप यांनी व्यक्त केले.