हिंदू संस्कृतीतील पौराणिक कथांनी जगभरात अनेकांना भूरळ घातली आहे. अनेकांनी नाट्य, चित्रपट आणि मालिकांच्या रुपाने या कथांचे सादरीकरण केले. दूरचित्रवाणीवरील ‘रामायण’ आणि ‘महाभारत’सारख्या मालिकांनी इतिहास घडविला. आजच्या माहितीयुगात पुराणकाळातील दिनविशेषाची माहिती पुरविणारे संदेश ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉट्सअॅप’सारख्या सोशल मिडियावरून शेअर करताना अनेकजण दृष्टीस पडतात. समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी देवतांनी असूरांशी युध्द करून त्यांचा वध केल्याच्या अथवा त्यांना नामोहरम केल्याच्या घटना हा पौराणिक कथांचा महत्त्वाचा भाग. पुराण काळातील तो दिवस दिनविषेश म्हणून साजरा केला जातो. सध्या टिव्हीवर ‘जय मल्हार’ नावाची मराठी मालिका सुरू आहे. शंकराचे रूप असलेल्या ‘खंडोबाराया’च्या जीवनावर आधारीत असलेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. आज ‘चंपाषष्ठी’, आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी व मल्ल दैत्यांचा वध केला. ‘चंपाषष्ठी’चे महत्व अधोरेखीत करणारा संदेश सोशल मिडियावर शेअर होत आहे. या दिवसाचे काय महत्व आहे ते जाणून घ्या…
आज चंपाषष्ठी, आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन ‘मणी’ व ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला. मार्गशीर्ष महिन्यात येणारे हे नवरात्र देवीच्या नवरात्रासारखेच असते. श्रीमहादेवाचा ‘मल्हारी मार्तंड’ हा एक अवतार होय.
पुण्याजवळ असलेल्या जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे. कृतयुगात ‘मणी’ व ‘मल्ल’ या राक्षसांना ब्रह्म देवाने, “तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही” हा वर दिला त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले. ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवांकडे मदत मागितली.
भगवान शंकर त्यांचे म्हणणे ऐकून संतप्त झाले. त्यांनी ‘मार्तंड भैरवा’चे रूप घेऊन आपले ७ कोटी (येळकोट) सैन्य घेऊन व कार्तिकेयासह ते ‘मणि’ व ‘मल्ल’ या राक्षसांवर चालून गेले. दोन्ही पक्षात प्रचंड युध्द होऊन अखेर मार्तंड भैरवांनी ‘मणी’ राक्षसाला त्याची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले. ‘मणी’ राक्षसाने शरण येऊन “माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे” अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले.
नंतर मार्तंड भैरवांनी ‘मल्ल’ राक्षसाचा पराभव केला, तेव्हा त्याने शरण जाऊन “तुमच्या नांवाआधी माझे नांव जोडले जावे अशी मागणी केली.” तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी (मल्ल+अरी) मार्तंड असे म्हणण्यात येते.