गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहणारा विनोदवीर कपिल शर्माला सध्या दिलासा मिळालाय. ‘द कपिल शर्मा शो’मधून नाराज होऊन बाहेर पडलेला त्याचा सहकलाकार आणि बालमित्र चंदन प्रभाकर आता शोमध्ये परततोय. कपिल आणि त्याच्या संपूर्ण टीमसाठी ही आनंदाची बातमी असून कीकू शारदाने चंदनचे विशेष स्वागत केले आहे. कपिल आणि चंदनचा सेटवरील फोटो ट्विटरवर शेअर करत किकूने चाहत्यांना ही बातमी दिली आहे.
ट्विटरवर दोघांचा फोटो शेअर करत किकूने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘नेहमी अशीच नाती सर्वोत्तम असतात, जी जगाचा विचार न करता भावनांनी जपली जातात.’ कीकूचा पोस्ट रि-ट्विट करत कपिल शर्मानेही अप्रत्यक्षपणे चंदनला शुभेच्छा दिल्या आहेत. आपले वैयक्तिक मतभेद बाजूला सारत पुन्हा एकत्र काम करण्याच्या या निर्णयामुळे दोघांचे चाहते मात्र नक्कीच खूष झाले आहेत.
Aksar wahi rishtey lajawaab hote hain, jo zamane se nahi, ehsaaso se bane hote hain @KapilSharmaK9 @haanjichandan welcome back bhai ?? pic.twitter.com/PKelheD98s
— kiku sharda ?? (@kikusharda) June 24, 2017
सुनील आणि कपिलमध्ये झालेल्या वादानंतर सुनीलसह, चंदन प्रभाकर आणि अली असगर या तिघांनीही एकाचवेळी हा शो सोडला होता. हे तिघेही कपिलसोबत पुन्हा कधी एकत्र काम करतील असे वाटले नव्हते. पण अचानक चंदनने आपले मत बदलले असे म्हणावे लागेल. कपिल आणि चंदन लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. किंबहुना दोघेही खूप चांगेल मित्र आहेत. मनातील कटूता दूर करत कपिलच्या शोमध्ये परतण्याचा निर्णय घेऊन चंदनने कपिलसोबतची मैत्री कायम ठेवली असे म्हणायला हरकत नाही.
वाचा : बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला सलमानसोबत पोहोचली लूलिया
मेलबर्नहून मुंबईमध्ये परतत असताना कपिलने मद्यधुंद अवस्थेत सुनील ग्रोवरला शिवीगाळ केली होती. एवढेच नाही तर त्याच्या दिशेने कपिलने बूटही फेकला होता. यावेळी अली आणि चंदनसोबतही कपिल उद्धटपणे वागला होता. या घटनेनंतर कपिलने अनेकदा माफीही मागितली.