अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी एका सुवर्ण संचयनी योजनेमध्ये फसवणूक केल्याचा आरोप एका गुंतवणुकदाराने केला आहे. याप्रकरणी गुंतवणुकदाराने शिल्पा आणि राज यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सचिन जोशी असं तक्रारदाराचं नाव आहे.

सचिन जोशी हे अनिवासी भारतीय (एनआरआय) असून त्यांनी खार पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. Satyug Gold Pvt Ltd या कंपनीकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप सचिन यांनी केला आहे. या कंपनीचं प्रमुखपद शिल्पा आणि राज यांच्याकडे होतं.

“मी १८.५८ लाख रुपये किंमतीचं सोनं या कंपनीकडून खरेदी केलं होतं. हा व्यवहार एका सुवर्णसंचयनी योजनेअंतर्गंत २०१४ मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी पाच वर्षांच्या योजनेअंतर्गंत खरेदीदारांना सवलतीच्या दरात ‘गोल्ड कार्ड’ देण्यात आलं. तसंच योजनेच्या अखेरीत काही प्रमाणात सोनंही त्यांना या योजनेतून काढता येणार असल्याची हमी दिली होती”, असं सचिन यांनी सांगितलं.

वाचा : Maharashtra Budget 2020 : नाट्यसंमेलनासाठी सरकारची मोठी तरतूद

‘एनडीटीव्ही’नुसार, २५ मार्च, २०१९ला जोशी यांची योजना संपुष्टात आली होती. त्यामुळे त्यांनी गोल्ड कार्डच्या सहाय्याने सोनं काढण्याचा निर्णय घेतला. त्यावेली वांद्रे-कुर्ला संकुल येथे असलेल्या या कंपनील टाळं असल्याचं लक्षात आलं. विशेष म्हणजे या प्रकरणाचा पाठपुरावा करत असताना शिल्पा आणि राज यांनी मार्च २०१६ आणि नोव्हेंबर २०१७ मध्ये कंपनीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिल्याचं समोर आलं.

वाचा : ‘Bigg Boss 3’च्या विजेत्यावर पबमध्ये हल्ला!

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सचिन यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. अद्यापतरी या प्रकरणी एफआयआर दाखल झाला नसून तपास सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.