अभिनेता सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘छिछोरे’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट महाविद्यालयीन मैत्री तेही आयआयटीतले वातावरण, त्यातही वसतिगृहातील राहणे, त्या आठवणी यावर बेतलेला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. सहा ते आठ कोटी रुपयांचा गल्ला जमवणार असा अंदाज वर्तविला जात असताना ‘छिछोरे’ने तब्बल 29.78 कोटी रुपये कमावले आहेत. ‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून देशभरातील ४ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत नितेश तिवारी म्हणाले, ‘’बॉक्स ऑफीस कलेक्शन किती होईल याचा मी खरंच काही विचार केला नव्हता. ‘दंगल’नंतर प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा फार वाढल्या होत्या. त्यामुळे त्या कशाप्रकारे पूर्ण करता येतील यावर मी जास्त भर दिला होता.‘’ ‘दंगल’सारखा यशस्वी चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक म्हणून नितेश तिवारी यांनी कुठल्याही चौकटीत न अडकता एक वेगळाच चित्रपट देण्याचा प्रयत्न केला आहे.

Photos : ‘पवित्र रिश्ता’चे चाहते आहात; मग हे फोटो पाहाच!

या चित्रपटाची कथा फार वेगळी आहे, असे नाही. मात्र गोष्ट सांगण्याची पद्धत नक्कीच वेगळी आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी दिग्दर्शकाने आजचा काळ आणि त्याला जोडून फ्लॅशबॅकचे तंत्र याचा उत्तम वापर केला आहे. चित्रपटाचा विषय हा आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आईवडील म्हणून मुलांवर स्पर्धापरीक्षा, नोकरी-व्यवसायातील कारकिर्दीच्या दृष्टीने दिला जाणारा अप्रत्यक्ष ताण, पती-पत्नींमधला दुरावा मुलांनी मान्य केला तरी त्या दोघांशीही जोडलेले राहण्याची मुलांची इच्छा याकडे पैसे कमावण्यात, आणि आपले अहंकार जपण्यात रमलेली एक पिढी साफ दुर्लक्ष करते आहे. यावर दिग्दर्शकाने गोष्ट सांगता सांगता सहज बोट ठेवले आहे.