बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे चित्रपटासाठी मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतात हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण आता मराठी कलाकार देखील यात मागे नाहीत. या गोष्टीचं तुम्हाला आश्चर्यही वाटू शकेल पण, हे खरंय. ‘चि. व चि.सौ.कां.’ चित्रपटातील मुख्य अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेने या चित्रपटासाठी ‘कुंग फू’चं प्रशिक्षण घेतलं आहे.
‘चि. व चि.सौ.कां.’ या चित्रपटातून प्रेक्षक मृण्मयीला मोठ्या पडद्यावर ‘कुंग फू’ करताना पाहू शकतील. मृण्मयीला तिच्या ‘कुंग फू’ बद्दल विचारल असता ती म्हणाली, ‘मी याआधी ‘कलरीपयट्टू’ शिकली आहे. तसंच मी (राष्ट्रीय पातळीवर) १० वर्ष बास्केटबॉलसुद्धा खेळली आहे. पण, ‘कुंग फू’ माझ्यासाठी फारच नवीन होतं. ते मी यापूर्वी कधीच शिकली नव्हती. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या महिनाभर आधी मला आणि ललितला ‘कुंग फू’चं प्रशिक्षण देण्यात आलं.’

मृण्मयी ‘चि. व चि.सौ.का’ या चित्रपटात ‘कुंग फू- ब्लू बेल्ट’ असलेल्या मुलीचं पात्र साकारत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या दृष्टीने हे ट्रेनिंग अतिशय महत्त्वाचं होतं. मुख्य म्हणजे तिला ‘कलरीपयट्टू’ आणि ‘बास्केटबॉल या खेळांची पूर्वकल्पना असल्यामुळे ‘कुंग फू’च्या प्रशिक्षणात त्याची खूप मदत झाली. याविषयीच सांगताना मृण्मयी म्हणाली, ‘आमचे ट्रेनर श्रीकांत सर यांनी खूप सक्त ट्रेनिंग देऊन आमच्याकडून कठीण व्यायाम व स्ट्रेचिंग करून घेतलं. मला असं वाटतंय मी एका महिन्यात वर्षभराचं ‘कुंग फू’ शिकलेय. ‘कुंग फू’चं प्रशिक्षण खूपच थकवणारं होतं, पण त्याची चित्रपटामध्ये आम्हाला खूप मदत झाली. यादरम्यान आम्हाला दुखापतही झाली पण, चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दृष्टीने हे सर्व महत्त्वाचं होतं.’

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले पहिल्यांदा स्क्रिन शेअर करत आहेत. झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन परेश मोकाशीने केलं आहे. मेच्या १९ तारखेला त्यांची ही आगळीवेगळी लग्न वरात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader