‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील ‘लाडू’ साऱ्यांच्याच लक्षात असेल. आपल्या निरागस आणि गोंडस चेहऱ्यामुळे लाडूने म्हणजेच राजवीरसिंह राजे या बालकलाकाराने अनेकांची मनं जिंकून घेतली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लाडू या मालिकेतून गायब झाला आहे. त्यामुळे सध्या हा लाडू नेमकं काय करतोय असा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल. तर, लाडू म्हणजेच राजवीरसिंह राजे लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे.
‘भारत माझा देश आहे’ या आगामी मराठी चित्रपटात राजवीर झळकणार असून या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री हेमांगी कवी स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या या चित्रपटाविषयी फारसा खुलासा करण्याकत आला नाही. मात्र, प्रदर्शित झालेल्या टीझर पोस्टरवरुन हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असल्याचं सांगण्यात येतं.
‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाचं दिग्दर्शन पांडुरंग कृष्णा जाधव करत असून निर्मिती डॉ. आशिष अग्रवाल करत आहेत. ‘अहिंसा परमो धर्म:, धर्म हिंसा तथैव च:’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या कथेविषयीची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून केवळ चित्रपटातील कलाकारांवरील पडदा दूर सारण्यात आला आहे. त्यामुळे हेमांगी आणि राजवीरसिंह व्यतिरिक्त या चित्रपटात देवाशी सावंत ( बालकलाकार), मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम, नम्रता साळोखे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.