दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा ‘सुलतान’ सलमान खान नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. सुट्टयांच्या दिवसांत चित्रपट प्रदर्शित केल्यामुळे कमाईच्या बाबतीतही चित्रपट बाजी मारतो. यावर्षीही ईदच्या मुहूर्तावर सलमानचा बहुप्रतिक्षित ‘ट्युबलाइट’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र ‘ट्युबलाइट’ प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अयशस्वी ठरला असं म्हणावं लागेल.
‘ट्युबलाइट’ची पहिल्या दिवसाची कमाई ही भाईजानच्या पाच वर्षांतील चित्रपटांच्या आकड्यांच्या तुलनेत फारच कमी होती. बॉक्स ऑफिसवरील ‘ट्युबलाइट’च्या या अपयशामुळे चित्रपटातील अभिनेत्री आणि सलमानची सहकलाकार झू झू नाखूष असल्याची माहिती आहे. खरं तर सलमानच्या चित्रपटांना १०० कोटींचा आकडा पार करायला वेळ लागत नाही. मात्र प्रदर्शनाच्या सात दिवसांनंतर ‘ट्युबलाइट’ने १०६.८६ कोटींची कमाई केली. प्रेक्षकांप्रमाणेच चीनी अभिनेत्री झू झूला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र चित्रपटाला मिळालेल्या थंड प्रतिसादामुळे ती नाराज झाली आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झू झू भारतात येणार असल्याची चर्चा होती. मात्र वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्याने ती प्रदर्शनानंतर भारतात येईल अशी माहिती दिग्दर्शक कबीर खान यांनी दिली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी केली नसल्याने तिने भारतात येण्याचे रद्द केल्याची माहिती मिळत आहे.
वाचा : अमेय वाघच्या लग्नात अवतरले तारे-तारका
दिग्दर्शक कबीर खान आणि सलमान खानने ‘ट्युबलाइट’ चित्रपटासाठी तिसऱ्यांदा एकत्र काम केलं. याआधी ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटासाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं आणि या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. शिवाय प्रेक्षक-समीक्षकांकडून स्तुतीदेखील झाली होती. त्यामुळे साहजिकच ‘ट्युबलाइट’साठी प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या. या चित्रपटाच्या अपयशाची फारशी चिंता न करता सलमान दिग्दर्शक कबीर खानसोबत आणखी एक चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होतेय. कबीर खानच्या आगामी चित्रपटात सलमान एका वृद्धाची भूमिका निभावणार असल्याचे म्हटले जात आहे.