सलमान खानच्या आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपटामधील ‘नाच मेरी जान’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये सलमान आणि सोहेलचं ‘भाईहूड’ पुन्हा एकदा पाहायला मिळते. शबिना खानने या गाण्याची कोरिओग्राफी केलीये. ‘खामोशी’, ‘दबंग’, ‘जय हो’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांमधील गाण्यांसाठीही शबिनाने सलमानला कोरिओग्राफ केलंय. त्यामुळे सुरूवातीपासूनच सलमान आणि कोरिओग्राफर शबिना खानमध्ये एक अनोखे बंध आहे असे म्हणायला हरकत नाही.
‘नाच मेरी जान’ हे गाणे विशेष असल्याचे शबिना सांगते. कट्टर मुस्लिम कुटुंबात शबिनाचा जन्म झाला जेथे तिला घरात टीव्ही बघण्याचीही परवानगी नव्हती. अशा परिस्थितीवर मात करत, कुटुंबाच्या मूल्यांना जपत तिने नृत्याच्या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
‘नाच मेरी जान’ या गाण्याविषयी सांगताना शबिना म्हणते, ‘गाण्यात सलमान आणि सोहेल सरांची भूमिका असल्याने त्याची कोरिओग्राफीदेखील अनोखीच हवी होती. प्रेक्षक, दिग्दर्शक आणि भूमिकांची गरज लक्षात घेऊन मी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. दिग्दर्शक कबीर खान यांनी माझ्या बाजूला बसून या गाण्याबद्दलची त्यांची गरज काय आहे हे समजावून सांगितले. त्यावर बराच विचार आणि संशोधन केल्यानंतर गाण्यातील पार्श्वभूमी १९६०च्या दशकाप्रमाणे ठेवण्याचा निर्णय घेतला.’
वाचा : या चित्रपटात युवराज सिंगने केलंय काम
कबीर खान आपला आवडता दिग्दर्शक असल्याचे सांगत त्याच्यासोबत काम करण्याची संधी कधीच सोडत नसल्याचे ती सांगते. ‘कबीर खान, सूरज बडजात्या आणि राजकुमार हिरानी हे माझे आवडते दिग्दर्शक असून त्यांच्या चित्रपटांमध्ये कोरिओग्राफ करण्याची संधी मी कधीच सोडत नाही,’ असे ती म्हणते. ‘नाच मेरी जान या गाण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे आणि प्रेक्षकांना हे गाणं नक्की आवडेल अशी मी अपेक्षा करते,’ असंदेखील ती म्हणाली.