“सुपरहिरो होण्यासाठी जादुई शक्तिंची गरज नसते. फक्त मनात इच्छा आणि मदत करण्याची प्रवृत्ती हवी तुम्ही आपोआप सुपरहिरो होता.” हे तत्वज्ञान ‘स्पायडरमॅन: होमकमिंग’ या चित्रपटात आयर्नमॅनने स्पायडरमॅनला सांगितलं होतं. या वाक्याला फॉलो करत एका सहा वर्षांच्या मुलाने आपल्या चार वर्षांच्या बहिणीचे प्राण वाचवले. त्याने आपल्या बहिणीसाठी पिसळलेल्या कुत्र्यासोबत भीषण युद्ध केले. या युद्धात तो जबरदस्त जखमी झाला आहे. त्याला तब्बल ९० टाके पडले आहेत. या मुलाच्या पराक्रमाची थेट सुपरहिरोंची निर्मिती करणाऱ्या मार्व्हल युनिव्हर्सने नोंद घेतली. व त्याला बक्षिस म्हणून सुपरहिरो ‘कॅप्टन अमेरिका’ची शिल्ड दिली.
या धाडसी मुलाचं नाव ब्रिजर वॉकर असं आहे. त्याची मोठी बहिण निक्की वॉकर हिने ब्रिजरच्या लढाईची संपूर्ण स्टोरी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली होती. ही थक्क करणारी स्टोरी व जखमी ब्रिजरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या स्टोरीची नोंद मार्व्हल युनिव्हर्सने देखील घेतली. अॅव्हेंजर्स चित्रपटात झळकलेले ख्रिस इव्हान (कॅप्टन अमेरिका), मार्क रफेलो (हल्क), ख्रिस हॅम्सवर्थ (थॉर), जेरेमी रेनर होकाय), स्कार्लेट जॉन्सन (ब्लॅक विडो) या कलाकारांनी स्वत: त्याच्या घरी जाऊन त्याचं कौतुक केलं. त्यांनी त्याला बक्षिस म्हणून कॅप्टन अमेरिकाची शिल्ड दिली. लक्षवेधी बाब म्हणजे ही शिल्ड अॅव्हेंजर्सच्या पहिल्या चित्रपटात ख्रिस इव्हानने वापरली होती. ब्रिजर वॉकरवर सध्या सोशल मीडियाद्वारे कौतुकाचा वर्षाव होत आहे.