कॉलेजचे मोरपंखी दिवस प्रत्येकजण मनात कायमचे जपून ठेवत असतो. कॉलेजमध्ये केलेली धमाल, मस्ती-मजा-मारामारी याच्या आठवणी स्टुडण्ट्स रीयुनियनमध्ये भेटून काढणारे अनेक क्लासमेट्स भेटतील. व्हॉट्सअॅप, फेसबुकमुळे शाळा-कॉलेजचे सवंगडी, मित्रमैत्रिणींना शोधून काढून भेटणेही आता सहजशक्य झाले आहे. कॉलेजचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन प्रत्यक्ष साजरे करण्याआधी हल्ली व्हॉट्सअॅपवर शाळा-कॉलेजच्या सवंगडय़ांचे ग्रुप आधी तयार झाले आहेत. व्हॉट्सअॅपवर एकमेकांचे फोटो टाकून कॉलेजमध्ये होतो तेव्हा कसे दिसायचो आणि आता कसे दिसतो ते एकमेकांना दाखविण्याची अहमहमिका लागते, मग त्यावरून मॅच्युअर पद्धतीने चिडवाचिडवी करायला व्हॉट्सअॅपचा उपयोग केला जातो. हीच धमाल आणि कॉलेजमध्ये केलेला राडा, धमाल, टिंगलटवाळी परंतु, मोबाइल-व्हॉटसअॅप, फेसबुक विरहित धमाल ‘क्लासमेट्स’ चित्रपटातून दाखविण्यात आली आहे.
एकमेकांची टेर खेचण्याच्या कॉलेजच्या मोरपंखी दिवसांत आपल्याच पीअर ग्रुपमधील मित्र-मैत्रिणींची गुपचूप गुटरगू हा तर सगळ्यांच्या चेष्टेचा विषय या चित्रपटातही आहे, इथे एक गुंडसदृश कॉलेजचा ‘भाई’ आहे, कॉलेजचं इलेक्शन आहे, गटबाजी आहे, कॉलेजचं गॅदरिंग आहे, कॉलेजमधल्या मुलीला प्रपोज करण्याचा सीन आहे असे बरेच काही आहे. आजच्या कॉलेजियन्सना या चित्रपटाच्या माध्यमातून नव्याने कॉलेजमधील मित्रमैत्रिणींची ओळखही होईल अशा पद्धतीची मांडणी दिग्दर्शकाने केली आहे. ‘चड्डीत राहायचं’, ‘दर्जा’, दोस्ती पटल्याची विशिष्ट खूण अशा सगळ्या गोष्टी कॉलेजच्या इलेक्शनमध्ये झालेल्या राडय़ाच्या फ्लॅशबॅक दाखविताना गुंफलेल्या आहेत. मराठी चित्रपटात अशा प्रकारे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन दाखविण्याचा प्रभावी प्रयत्न लेखक-दिग्दर्शकांनी केला असला तरी हिंदीत अशा प्रकारचे चित्रण यापूर्वी बऱ्याचदा येऊन गेले आहे. दुनियादारी या गाजलेल्या चित्रपटाचा किंचितसा प्रभावही या चित्रपटाच्या कथा-पटकथेवर आहे असेही प्रेक्षकांना जाणवू शकते. परंतु, एकामागून एक प्रसंग, घटनांची गुंफण करताना दिग्दर्शक प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी झालाय हे नक्की.
कॉलेज, प्रेम, धमाल-मस्ती म्हटलं की गाणी-संगीत हे अशा चित्रपटांचा अविभाज्य भाग असणं हे अपेक्षित असतं. त्याप्रमाणे यातही गाणी व संगीताची भट्टी बऱ्यापैकी जमली आहे.
अन्या उर्फ अनी म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर याच्या कॉलेज प्रवेशाने चित्रपटाची सुरुवात होते आणि रॅगिंगसदृश्य दृश्यातून सत्या म्हणजे अंकुश चौधरी, अप्पू म्हणजे सई ताम्हणकर, अमित म्हणजे सुयश टिळक अशा गँगची ओळख दिग्दर्शकाने अगदी थोडक्यात पण प्रभावीपणे करून दिली आहे. कॉलेजचे रियुनियन म्हटलं की सर्वच प्रमुख पात्रांची ओळख स्वतंत्रपणे करून देण्याची पद्धत न वापरता सहजपणे फ्लॅशबॅकमधून करून देण्याची दिग्दर्शकाची पद्धत उत्तम सादर केली आहे.
अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सुयश टिळक, पल्लवी पाटील, सुशांत शेलार, सचित पाटील, सिद्धार्थ चांदेकर, रमेश देव, किशोर शहाणे, संजय मोने अशा सगळ्याच कलावंतांनी आपापल्या व्यक्तिरेखा चांगल्या पद्धतीने वठविल्या आहेत. उत्तम अभिनय हे या चित्रपटाचे बलस्थान म्हणता येईल.
कॉलेजमध्ये शिकत असलेल्या खासकरून लास्ट ईयरला शिकत असलेल्या तरुणाईने आणि कॉलेज शिकून वर्षे उलटलेल्या प्रेक्षकांनाही आपापल्या कॉलेज क्लासमेट्स सोबत बसून सिनेमातल्या घटना आणि सिनेमातल्या प्रेमी जोडय़ा आणि आपल्या आयुष्यातील कॉलेजचे मोरपंखी दिवस आणि घटना, प्रेमप्रकरणे व अन्य मौजमस्ती याच्या आठवणी हा सिनेमा पाहत जागवायला काहीच हरकत नाही.
व्हिडिओ पॅलेस, एस. के. प्रॉडक्शन्स प्रस्तुत
क्लासमेट्स
निर्माता – सुरेश पै
दिग्दर्शक – आदित्य अजय सरपोतदार
छायालेखन – के के मनोज
पटकथा – क्षितिज पटवर्धन, समीर विद्वांस
संवाद – क्षितिज पटवर्धन
संगीत -अविनाश-विश्वजीत, अमितराज, पंकज पडघन, ट्रॉय-अरिफ
संकलन – इम्रान-फैझल
कलावंत – अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सुयश टिळक, पल्लवी पाटील, सुशांत शेलार, सचित पाटील, सिद्धार्थ चांदेकर, रमेश देव, किशोर शहाणे, संजय मोने व अन्य.
सत्या, अप्पू, अदिती, अमित, हिना, प्रताप, रोहित, अनी,