उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली आहे. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज आहे. आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार आहोत असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर अनेक कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे.

शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे विविध जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी नव्या फिल्म सिटीची घोषणा केली. देशाला एका चांगल्या फिल्म सीटीची गरज आहे. उत्तर प्रदेश ही जबाबदारी घेण्यास तयार आहे. आम्ही येथे एक भव्य फिल्म सिटीची उभारणी करु. फिल्मसिटीसाठी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवेचे क्षेत्र चांगले ठरेल. ही फिल्मसीटी चित्रपट निर्मात्यांना चांगली संधी मिळवून देणार आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. लवकरच यावर काम सुरु करण्यात येईल असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

त्यांच्या या निर्णयाचे अनेक कलाकारांनी स्वागत केले. अभिनेत्री कंगाना रणौत, कॉमेडियन राजू श्रीवास्तव, गायक अनुप जलोटा यांनी ट्विट करत योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. पण कंगानाने मात्र योगी यांचे आभार मानत अप्रत्यक्षपणे बॉलिवूडवर निशाणाच साधला.

काय म्हणाली कंगना?

“फिल्म उद्योगात आता नव्या बदलाची गरज आहे. बॉलिवूड ही देशातील सर्वोत्कृष्ट फिल्म इंडस्ट्री आहे असं लोकांना वाटतं. परंतु हा गैरसमज आहे. तमिळ इंडस्ट्री बॉलिवूडपेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्याला एका अशा इंडस्ट्रीची गरज आहे ज्याला भारतीय फिल्म इंडस्ट्री म्हणता येईल. आपल्याला विभागलं जातंय ज्याचा फायदा हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीला मिळतो.” अशा आशयाची दोन ट्विट कंगनाने केली.