कॉलेज आठवणींचा कोलाज  

प्रथमेश परब

मी डहाणूकर कॉलेजचा माजी विद्यार्थी. कॉलेजचा पहिला दिवस माझ्यासाठी खूप विचित्र होता. डहाणूकर कॉलेजचं आवार खूप मोठं आहे. तिकडचं वातावरण आणि गजबजाट आमच्यासाठी नवीन होता. त्यातल्या त्यात आम्ही एका शाळेतले आणि वर्गातले चार-पाच मित्र एकत्र होतो, तेवढीच काय ती ओळख. शिवाय एका वर्गात १५० मुलं आणि चार ते पाच तुकडय़ा होत्या. त्यामुळे पहिला दिवस खूप साऱ्या मुलामुलींनी गजबजलेला होता. डहाणूकरमध्ये येणारी पोरं बऱ्यापैकी मोठय़ा घरांतली असतात. त्यामुळे निभाव लागेल का, असा प्रश्न त्या वेळी पडला होता.

कॉलेजमध्ये एक नाटकाचा कट्टा आणि क्रिकेटचा कट्टा होता. नाटकाच्या आधी मला क्रिकेट खूप आवडायचं. आजही आवडतं. अकरावीला प्रामाणिकपणे मी जास्तीत जास्त दोन आठवडे कॉलेजच्या लेक्चरला बसलो असेन. त्याच्यानंतर मी सलग रिसेसच्या वेळेस कॉलेजला जायचो. साधारण एक-दीडच्या दरम्यान! तिकडं थोडासा डबा खायचो आणि त्यानंतर सरळ कॉलेजच्या मागे आमच्या प्ले ग्राऊंड आहे, तिकडं क्रिकेट खेळायला जायचो. मुळात त्या वेळी मला ३० रुपये पॉकेटमनी मिळायचा, त्यात येण्याजाण्याचा खर्च असायचा. हे पैसे वाचवायचे म्हणून मी अंधेरी ते पार्ले पायी चालत जायचो. शिवाय, पैसे कमी पडायचे म्हणून आम्ही मॅचेस खेळायचो. आमची टीम बऱ्यापैकी असल्याकारणाने आम्ही मॅचेस जिंकायचो आणि पॉकेटमनीचे पैसे ‘डबल’ व्हायचे. मग त्याची आम्ही मित्र कधी पार्टी करायचो. मला आठवतंय पावसाळ्यात क्रिकेट खेळताना कपडे खराब व्हायचे, तसाच घरी जायचो, तेव्हा आई बोलायची की कॉलेजला शिकायला जातोयस की फक्त खेळायला जातोयस?

नाटक कट्टय़ावरच्याही भरपूर आठवणी आहेत. जेव्हा मी नाटकाचा ‘ग्रुप जॉइन’ केला, तेव्हा माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कारण झालं असं की, मला एकदा अटेंडन्स हवा होता. क्रिकेट खेळत असल्याकारणामुळे माझं ‘अटेंडन्स’ नव्हतं. ते भरून काढावं म्हणून कॉलेजचं मराठी नाटय़ मंडळ मी जॉइन केलं. तिथं एवढा रमलो की क्रिकेट विसरलो. तसेच तिथं रमण्याचं आणखीन एक दुसरं कारण म्हणजे आमच्या कॉलेजला सगळे इंग्लिशमध्येच बोलायचे, लेक्चरपण इंग्लिशमध्येच असायची. मला इंग्लिश कळत नव्हतं, असं नाही. पण मी त्यात कम्फर्टेबल नव्हतो. मात्र मराठी नाटय़ मंडळात सगळं मराठीतच होतं, शिवाय तिकडे चांगले मित्र मिळाले, खूप चांगली गट्टी जमली. तिकडूनच मला असं वाटतं की, मला मी कळू लागलो. आता जे काही मी मिळवलंय ते सर्व याचमुळे.

कॉलेजच्या नाटय़विश्वातील खूप साऱ्या स्पर्धेत मी भाग घेतला आहे. त्याआधी कधीच लोकांसमोर वा स्टेजवर गेलो नव्हतो. नाटकामुळे त्याचा अनुभव मिळाला. दरम्यान, आयएनटी, मृगजळ, स्पंदन तसेच ‘युनिव्हर्सिटी’ची युवा महोत्सव म्हणून एक स्पर्धा असते, या सगळ्यांत मी भाग घेतला. योगायोग म्हणजे आता मी ‘दहा बाय दहा’ हे नाटक ज्या सहकलाकारासोबत करतो आहे, त्या विजय पाटकर सरांकडून मला त्या वेळी ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चा मान मिळाला होता. माझ्या आठवणीप्रमाणे, मृगजळच्या वेळी पहिल्यांदा त्यांची आणि माझी भेट झाली होती. आमचं नाटक संपल्यावर ते मला येऊन भेटले होते, आणि ‘तुला मी कन्फर्म बेस्ट अ‍ॅक्टर देणार’ असं बोलले होते. त्या वेळी खूप भारी वाटलं होतं. माझ्यातला ‘स्पार्क’ सर्वात आधी त्यांनी ओळखला होता.

मला अजूनही आठवतंय की, अकरावीला असताना मी ‘बॅकस्टेज’ करायचो, पण तरीही मला मुलांनी एक छोटा ‘रोल’ करायला लावला होता. तो काय मला नीटसा जमला नाही. १२ वीला मात्र कॉन्फिडन्स येत होता, पण त्या वेळी माझी निवड काय झाली नाही. तरी मी त्या वेळेला ‘म्युझिक ऑपरेट’ केलं. त्यानंतर मग नाटक काही वेळ थांबवलं होतं. कारण मला अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायचं होतं. माझा हा निर्णय जेव्हा मित्रांना कळला त्या वेळी ते खूप हसले. ‘तू काय करणार अभ्यास करून, असे किती टक्के मिळवणार आहेस? वगैरे बोलले होते. पण मी निश्चय केला होता, त्याप्रमाणे प्रामाणिक अभ्यास केला. बारावीला चांगल्या मार्कानी जेव्हा पास झालो तेव्हा नाटय़ मंडळातील सर्व पोरं माझ्याकडे ‘रिस्पेक्ट’ने पाहायला लागली. मला ७९ टक्के मिळाले होते, तर मराठीत ८६ मार्क्‍स होते. नाटय़ मंडळातील आमचे हेड माने सर यांनी माझा रिझल्ट बघितला तेव्हा तेदेखील शॉक झाले होते. तेरावीला असताना बी.पी. ही एकांकिका मी केली, त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी त्यावर सिनेमा आला. पुढे ‘टाईमपास’ मिळाला. कॉलेजचा शेवटचा दिवस म्हणाल तर अजूनही माझा कॉलेजचा शेवटचा दिवस आलेला नाहीये. कारण आजही मी कॉलेजच्या नाटय़ मंडळात जाऊन भेट देतो, तेथील मुलांना भेटतो. त्यांच्यातली एनर्जी बघून मलाही बरंच काही शिकायला मिळतं. माझा शेवटचा श्वास म्हणजे डहाणूकर कॉलेजमधील माझा शेवटचा दिवस असेल, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही.

शब्दांकन : मितेश जोशी

Story img Loader