मूकपट गाजविणारा अवलिया विनोदश्रेष्ठ चार्ली चॅप्लिन यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. आपल्या अनोख्या अभिनय शैलीने फक्त हावभावांच्या बळावर त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. आजच्या घडीला ते आपल्यात नसले तरीही त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून आजही चित्रपटसृष्टी आणि हावभावांवर जबर पकड असलेला हा अवलिया आपल्यातच आहे असंच म्हणावं लागेल.

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार म्हणून त्यांचा नावलौकिक होता. चार्ल्स स्पेन्सर चॅप्निल म्हणजेच चार्ली चॅप्लिन यांच्या कारकिर्दीवर आणि त्यांच्या जीवनप्रवासावर एक दृष्टीक्षेप टाकला असता त्यांच्या वाट्याला आलेल्या यशाचा हेवा वाटल्यावाचून राहात नाही. पण, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये चार्ली चॅप्लिन यांचा संघर्षाचा काळ होता. चार्ली चॅप्लिन यांनी विनोदबुद्धी आणि माणुसकी या दोन गोष्टींवर जोर देत आपल्या अभिनयाची छाप पाडली. अभिनयासाठी समानार्थी शब्द म्हणूनही या महान अभिनेत्याच्या नावाचा उल्लेख केला जातो. ‘वेळ हाच माझा शत्रू आहे’, असं म्हणणाऱ्या चार्ली चॅप्लिन यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता तो क्षण आजही अकॅडमी अवॉर्ड्सच्या इतिहासात सुवर्णाक्षरांत नोंदवला गेला आहे. वेगळ्याच धाटणीचा अभिनय प्रेक्षकांसमोर सादर करणाऱ्या आणि जगभरात स्वत:चा प्रेक्षकवर्ग निर्माण करणाऱ्या चार्ली चॅप्लिन यांना १९७२ मध्ये मानाच्या ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण…

यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर इट या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये चॅप्लिन यांचा गौरव करण्यापूर्वी त्यांची ओळख करुन देण्यासाठी दिलेलं भाषणही अनेकांच्या मनात घर करत आहे. इतिहासाच्या पानांमध्ये न राहता प्रत्येक पिढीच्या साथीने जगणारा असा हा अभिनेता ऑस्कर मिळताच फार भावूक झाल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. कोणत्याही कलाकाराचं स्वप्न असणारी ऑस्करची ट्रॉफी ज्यावेळी चॅप्लिन यांच्या हातात स्थिरावली तेव्हा त्यांचा आनंद अश्रूंच्या वाटे बाहेर आला. त्या वेळी ऑस्कर सोहळ्यासाठी जमलेल्या सर्वांनीच या महान अभिनेत्याला दाद देण्यासाठी उभं राहून त्यांच्यावर टाळ्यांचा वर्षाव केला. ऑस्करच्या इतिहासात आजतागायत इतर कोणत्याच अभिनेत्याला इतक्या जास्त वेळासाठी अशा प्रकारची दाद देण्यात आली नव्हती.

वाचा : आमिरला चित्रपटात दगा देणारा ‘तो’ झाला यशस्वी अभिनेता

हा पुरस्कार मिळाल्यानंतर चॅप्लिन यांना त्यांची लाडकी काठी आणि त्यांची ओळख असणारी टोपी देण्यात आली होती. तेव्हा टोपी डोक्यात घातलातानाही त्यांनी मोठ्या विनोदी अंदाजात ती उडवत उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. त्यांचा हा अंदाज पाहता कलाकार शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या कलेची साथ सोडत नाही या ओळींवर विश्वास बसत आहे.