विनोदवीर कपिल शर्मासाठी २०१७ हे वर्ष फारसं चांगलं राहिलं नाही. अगदी नैराश्यात असण्यापासून कार्यक्रम बंद होण्यापर्यंतच्या बऱ्याच प्रसंगांनी कपिलच्या वाटेत अडचणी निर्माण केल्या. त्यातच भर पडली ती म्हणजे विनोदवीर सुनील ग्रोवरसोबतच्या त्याच्या वादाची. या साऱ्यातून सावरत कपिल सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. पण, चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी विविध कार्यक्रमांना आणि ठिकाणांना भेट देणाऱ्या कपिलला त्याच्या आणि सुनील ग्रोवरच्या वादाविषयी बरेच प्रश्न आजही विचारले जातात. अशाच एका प्रश्नाचं उत्तर देत शेवटी कपिलचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मी काही पाप केलंय का? असं विचारत त्याने या वादावर प्रतिक्रिया दिली.

‘फिरंगी’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कपिल दिल्लीला पोहोचला होता. त्यावेळी त्याला माध्यमांच्या प्रश्नांचा सामना करावा लागला. यंदा वर्षभरात झालेले वाद पाहता या साऱ्यांचा तुझ्या चित्रपटाच्या कमाईवर काही परिणाम होण्याची चिन्हं आहेत का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. तेव्हा, कोणता सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात अडकला नाही असं एकतरी नाव मला सांगा, असं म्हणत याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘मी असं काय पाप केलंय की, लोक आपला द्वेष करु लागले’, असं म्हणत कपिलने आपली बाजू मांडली.

वाचा : व्हायरल होणाऱ्या सुंदर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला प्रेक्षकांचे प्रेम मिळते त्या बाबतीत वेळ पडल्यास त्यांना इतरांच्या द्वेषाचाही सामना करावा लागणं अपेक्षित आहे, असं तो म्हणाला. सुनील ग्रोवरसोबतच्या आपल्या वादाविषयी त्याने फार काही बोलण्यास नकार दिला. पण, भविष्यात पुन्हा कधी सुनीलसोबत काम करण्याची संधी मिळाली तर ती संधी आपण नक्कीच स्वीकारु असेही त्याने स्पष्ट केले. कपिलचे हे उत्तर पाहता येत्या काळात सुनीलसोबत काम करण्यासाठी तो आशावादी असल्याचे स्पष्ट होतेय. तुर्तास तो आगामी चित्रपटासाठी फारच उत्सुक असून, आता त्याचा हा ‘फिरंगी’ अंदाज प्रेक्षकांची मनं जिंकतो का, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.