आपल्या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात काही अफलातून कलाकार दडलेले आहेत, असे वारंवार म्हटले जाते. काही कलाकारांकडे पाहून ते विधान पटतेही. अशाच एका कलाकाराने नुकतीच ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याची कला पाहून प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. त्या कलाकाराचे नाव आहे, श्याम रंगीला.
श्याम रंगीलाने यावेळी परीक्षकांच्या आसनावर बसलेल्या अक्षय कुमार, मल्लिका दुआ, झाकिर खान यांना खळखळून हसवले. श्यामने त्याला मिळालेल्या संधीचा पूरेपूर वापर करत मोठ्या कलात्मकतेने त्याची कला सादर केली. त्याने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची हुबेहूब नक्कल केली. टेलिव्हिजन विश्वात प्रसिद्ध मालिका या दोन्ही नेत्यांनी पाहिल्या असत्या तर त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया असती याचे सुरेख सादरीकरण त्याने केले आणि प्रेक्षकांच दाद मिळवली. एकाच कथानकाचा गाडा लोटणाऱ्या या मालिकांवर श्यामने विनोदी अंदाजात निशाणा साधला आहे असे म्हणालयला हरकत नाही.
वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा
श्याम रंगीला या नकलाकाराचा हा अफलातून अंदाज सध्या बराच चर्चेत असून, सोशल मीडियावर तो व्हायरलही होत आहे. या व्हिडिओमुळे अनेक नेटकऱ्यांनी युट्यूबचा आधार घेत श्यामचे व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एका अर्थी सोशल मीडिया श्यामची कला जास्तीज जास्त रसिकांपर्यंत पोहोवण्यास मोलाची मदत करत आहे असे म्हणायला हरकत नाही. राजस्थानच्या श्री गंगानगर भागातील हा सर्वसामान्य मुलगा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.