बॉलिवूडमधील विनोदाचे बादशहा राहिलेले जॉनी वॉकर म्हणजेच बदरुद्दीन जमालुद्दीन काजी. जॉनी वॉकर यांची ओळख करून देण्याची खरं तर काहीच गरज नाही. जन्मभर त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसविले. अशा या विनोदवीराने २९ जुलै २००३ रोजी जगाचा निरोप घेतला.
वाचा : मद्यधुंद अवस्थेत संजय दत्त श्रीदेवीच्या चेंजिंग रुममध्ये घुसला होता आणि..
कोणालाही रडविण्यापेक्षा हसविणे हे सर्वात कठीण काम असते असं म्हणतात. मात्र, हे काम जॉनी वॉकर अगदी सहज करत असत. त्यांनी आपल्या अभिनयाने लाखो लोकांच्या मनावर राज्य केले. ‘सीआईडी’ चित्रपटातील ‘ऐ दिल है मुश्किल जीना यहां, जरा हटके जरा बचके ये है बॉम्बे मेरी जां’ गाणे जॉनी वॉकर यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. मुंबईतील बसची अवस्था या गाण्यातून दाखविण्यात आली होती. चित्रपटसृष्टीत काम करण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या या अभिनेत्याने कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बस कंडक्टरची नोकरी केली होती. सुरुवातीपासूनच त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याचे वेड होते. लोकांच्या नकला करण्यात ते कुशल होते. कंडक्टरची नोकरी करत असताना ते मिमिक्री करून प्रवाशांचे मनोरंजन करत असत.
वाचा : क्रिती सनॉनवर भैरवी गोस्वामीची अर्वाच्च शब्दांत टीका
जॉनी वॉकर यांच्यावर प्रभावित झालेल्या गुरु दत्त यांनी ‘बाजी’ चित्रपटात त्यांना काम करण्याची पहिली संधी दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. गुरुदत्त यांच्या ‘आर-पार’, ‘प्यासा’, ‘चौदहवी का चाँद’, ‘कागज के फूल’, ‘मिस्टर अॅण्ड मिसेज ५५’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. बदरुद्दीन जमालुद्दीन काजी यांना जॉनी वॉकर अशी ओळख देणारेही गुरु दत्तच होते असे म्हटले जाते. आपल्या विविध अंदाजांनी आणि हावभावांनी जवळपास चार दशकं लोकांचे मनोरंजन करणाऱ्या या महान हास्य कलाकाराचे २९ जुलै २०१३ रोजी निधन झाले.