‘टॉयलेट- एक प्रेम कथा’, ‘पॅडमॅन’ यांसारख्या चित्रपटांची निर्माती प्रेरणा अरोरा हिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मसाज करणाऱ्या महिलेला तिचा मोबदला दिला नसल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. त्याचप्रमाणे शिवीगाळ करत हात उगारल्याची तक्रारही मेघावाडी पोलीस स्थानकात संबंधित महिलेकडून दाखल करण्यात आली आहे.

खैरुन मुख्तार अहमद या ६० वर्षीय महिलेनं प्रेरणावर आरोप केले आहेत. सांताक्रूझमध्ये राहणारी ही महिला गेल्या दहा वर्षांपासून प्रेरणा अरोराच्या संपर्कात आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून प्रेरणाने तिचे पैसे थकवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याविषयी संबंधित महिला म्हणाली की, ‘प्रेरणा अरोरा मसाजसाठी मला बोलवायची. दर महिन्याला त्याचे ७५ हजार रुपये मोबदला म्हणून देण्याचं तिने मान्य केलं होतं. जेव्हा मी पैशांसाठी विचारलं तेव्हा मी कुठे पळून जात नाहीये असं उत्तर तिने दिलं. त्यानंतर एकदा १ लाख २५ हजार रुपयांचा चेक तिने दिला पण तो बाऊन्स झाला. एकूण ३ लाख ७५ हजार रुपये तिने थकवले आहेत. ९ जून रोजी जेव्हा मी पैसे मागण्यासाठी तिच्या घरी गेली तेव्हा तिने जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. माझ्यावर हातसुद्धा उगारला आणि जोरात दरवाजा आपटून मला घराबाहेर काढलं.’

दुसरीकडे घरातून पैसे चोरल्याचा आरोप प्रेरणाने तिच्यावर केला आहे. ५६ हजार रुपये घरातून चोरताना तिला माझ्या अंगरक्षकाने रंगेहाथ पकडलं होतं. तिला फार छोटी रक्कम द्यायची असून ते लवकरात लवकर मी परत करेन, असंही तिने म्हटलं.