इंदिरा गांधी पंतप्रधान असताना लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित ‘इंदु सरकार’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. काँग्रेस पक्षाने चित्रपटाचा विरोध करायला सुरुवात केली आहे. अलाहाबादच्या एका काँग्रेस नेत्याने चित्रपटाचा विरोध करत दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्या चेहऱ्याला काळं फासणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.

अलाहाबादचे काँग्रेस नेता हसीब अहमद यांनी हा पोस्टर प्रदर्शित केला आहे. या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, ‘नेहरू-गांधी कुटुंबाला बदनाम करणाऱ्या इंदु सरकार या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक मधुर भंडारकरच्या चेहऱ्याला काळं फासणाऱ्याला १ लाख रुपये रोख बक्षिस म्हणून दिले जाईल.’ हसीब अहमद हे याआधीसुद्धा वादग्रस्त पोस्टर आणि होर्डिंग लावण्यासाठी चर्चेत आले होते. हा पोस्टर काही वेळेतच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

congress-poster

‘इंदु सरकार’ चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी या पोस्टरचा विरोध करत ट्विट केलाय. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, ‘वाह, इतकं बोलण्याचं स्वातंत्र्य!’ भंडारकर यांच्या ट्विटनंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी त्यांचे समर्थन केले. तर सोशल मीडियावरून धमक्या येत असल्याची तक्रार हसीब अहमद यांनी केली आहे.