चित्रपट विश्वामध्ये कधी कोणाचे नाव कोणासोबत जोडले जाईल यावर काहीच भरोसा नाही. या अनिश्चिततेच्या दिवसांमध्ये चक्क चित्रपटांमध्येही काही योगायोग जुळून आल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच योगायोगांचे एक उदाहरण म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ आणि मन्सूर खान दिग्दर्शित ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटांमध्ये असणारी गोष्ट एका योगायोगाची.
२०१६च्या एप्रिल महिन्यामध्ये २९ तारखेला ‘सैराट’ प्रदर्शित झाला. बघता बघता रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या जोडीने प्रेक्षकांना ‘याड लावलं’… आणि महाराष्ट्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मनोरंजन पटलावरही ‘सैराट’ वारे वाहू लागले. सानथोरांपासून प्रत्येक वर्गाला त्यांच्या त्यांच्या परिने काहीना काही देऊन गेलेला हा चित्रपट एक मैलाचा दगड ठरला. पण, नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यापूर्वी बऱ्याच वर्षांपूर्वी परफेक्शनिस्ट आमिर खानच्या चित्रपटाने अक्षरश: ‘कयामत’ आणली होती. तो चित्रपट म्हणजे मन्सूर खान दिग्दर्शित ‘कयामत से कयामत तक’. २९ वर्षापूर्वी २९ एप्रिललाच त्यावेळच्या युवा पिढीचे जबरदस्त आकर्षण ठरलेला ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाचीही अशीच हवा प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली होती. त्यामुळे सैराटचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांनी अनुभवला होता असं म्हणायला हरकत नाही.
वाचा: #SairatMania : .. म्हणून अरबाजवर आली रडण्याची वेळ!
कयामत….च्या पूर्वप्रसिद्धीची सुरूवात गंमतीदार झाली. आमिर खानपेक्षा दिग्दर्शक मन्सूर खानच्या नावाला पसंती मिळू लागली. चित्रपटात घरच्यांच्या विरोधाशी संघर्ष करीत साकारलेली प्रेमकथाच दाखवण्यात आली होती. तात्कालिक युवा पिढीची भाषा, मानसिकता, परिस्थितीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन हे सर्व पैलू शिताफीने हाताळण्यात आले होते. कोणत्याही चित्रपटाच्या बाबतीच हेच महत्त्वाचे ठरते. ‘कयामत से कयामत तक’ने आमिर खान-जुही चावला हे नवोदित कलाकार रातोरात स्टार झाले. चित्रपटाची कथा, एकंदर कथानक आणि चित्रपटातून झळकलेल्या नव्या चेहऱ्यांना मिळालेली प्रेक्षकांची पसंती हे सारे २९ वर्षांपूर्वी चित्रपसृष्टीने अनुभवले होते. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होते याची प्रचितीच जणू ‘सैराट’ने दिली.
वाचा: #SairatMania : ‘आर्ची प्रत्येक मुलीमध्येच असते, पण ती बिनधास्तपणे व्यक्त व्हायला घाबरते’
विशेष म्हणजे या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी होती. अगदी त्याचप्रमाणे ‘सैराट’मध्येही अजय-अतुल या संगीत दिग्दर्शक जोडीने त्यांच्या ‘झिंगाट’ संगीताने प्रेक्षकांना घायाळ केलं. तर मग ही होती योगायोग, प्रेम, आठवणी, सामाजिक भान आणि बरंच काही शिकवून गेलेली सैराट योगायोगाची गोष्ट!
#SairatMainia तुम्हाला कसा वाटतोय… तुमच्या काय आठवणी आहेत… ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा… loksatta.express@gmail.com या ईमेल आयडीवर….