करोनाशी सामना करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी पुढे येत असून आर्थिक मदत करत आहेत. यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करत आहेत. यासोबतच जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांचे आभार मानत आहेत. सेलिब्रेटी घऱात थांबून सहकार्य करत आर्थिक मदत देत असताना अभिनेता अजय देवगणने पोलिसांसोबत रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे. अजय देवगणने तसं ट्विटच केलं आहे.

अजय देवगणने ट्विट करत म्हटलं आहे की, “प्रिय मुंबई पोलीस…तुम्ही जगातील सर्वोत्तम असणाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जाता. करोनाशी लढा देताना तुम्ही दिलेलं योगदान अतुलनीय आहे. तुम्ही जेव्हा कधी सांगाल तेव्हा हा सिंघम खाकी घालून तुमच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र”.

अजय देवगणने इतर सेलिब्रेटींप्रमाणे आर्थिक मदतही केली आहे. अजय देवगणकडून पीएम केअर फंडसाठी २५ कोटी ५१ लाख तर महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच कोटींची आर्थिक मदत दिली आहे. याशिवाय अजय देवगणकडून फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइजला ५१ लाखांची मदत देण्यात आली आली. अशोक पंडित यांनी ट्विट करत ही माहिती दिली होती. कठीण परिस्थिती असते तेव्हा आपण खरे सिंघम असल्याचं वारंवार सिद्ध केलं आहेस अशा शब्दांत अशोक पंडित यांनी अजय देवगणचे आभार मानले होते.