सध्या संपूर्ण जग करोना विषाणूच्या सावटाखाली आहे. चीनमधील वुहान शहरातून फैलाव झालेल्या या विषाणूने जवळपास ९० पेक्षा जास्त देशांमध्ये पाय पसरवले आहेत. या भारताचाही समावेश आहे. भारतातही या विषाणूची लागण झालेली काही रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लॉकडाउन करण्याची घोषणा केली.  त्यामुळे सध्या या लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सारं काही बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटींनी गरजूंसाठी मदत करत आहेत. यामध्येच रंगमंच कामगार संघटना आणि काही कलाकार मंडळींनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे.

काही दिवसापूर्वी अभिनेता प्रशांत दामले यांनी पडद्यामागील कलावंतांना आर्थिक मदत केली होती. त्यानंतर आता रंगमंच कामगार संघटना आणि काही कलाकारांनी एकत्र येत गरजूंमध्ये शिधा वाटप केलं असून शक्य होईल तितकी आर्थिक मदतही केली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना एक महिना पुरेल इतका शिधा देण्यात आला आहे.

‘रंगमंच कामगार संघटना आणि कलाकारांनी स्वखुशीने ही मदत केली असून यात नागरिकांना निदान एक महिना पुरेल इतका शिधा देण्यात आला आहे. यात तांदूळ, डाळ,साखर, तीळ, सॅनिटाझर या गोष्टींचा समावेश असून दैनंदिन दिवसामध्ये लागणारी भाजी, दूध नागरिकांना आणता यावं यासाठी १ हजार रुपयांची आर्थिक मदतही केली आहे. तसंच हे काम करण्यापूर्वी आम्ही परिवहन मंत्री अनिल परब यांची परवानगी घेतली आहे’, असं अभिनेता सुशांत शेलार म्हणाला.

पुढे सुशांतने सांगितलं, ‘आज आम्ही परेल, वरळी,गिरगाव, शिवडी, काळाचौकी अशा ठिकाणी राहणाऱ्या जवळपास ३०-४० कुटुंबांना मदत केली. ही मदत आम्ही अशीच सुरु ठेवणार असून पुढच्या टप्प्यात सायन, भांडूप, चेंबूर या ठिकाणी जाणार आहोत. या कार्यामध्ये रंगमंच कामगार संघटनेप्रमाणेच अनेक कलाकारांचा समावेश आहे. सुबोध भावे, भरत जाधव ही कलाकार मंडळीही मदत करत आहेत. मात्र प्रत्येकवेळी सगळ्या कलाकारांना जाणं शक्य नसल्यामुळे कलाकारांचा प्रतिनिधी म्हणून मी स्वत: जात आहे’.

दरम्यान, यापूर्वीदेखील बऱ्याच वेळा कलाकारांनी गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा येथील  निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये देखील कलाकारांनी पूरग्रस्तांना मदत केली होती. त्याचप्रमाणे यावेळीदेखील ते गरजूंच्या मदतीसाठी पुढे आल्याचं दिसून येत आहे.