बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता फक्त बॉलिवूड स्टार नाही तर एक ग्लोबल सेन्सेशन आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपलं नाव कमवत तिने प्रसिद्धीची देशी सीमारेषा ओलांडली आहेत. तिचा दमदार अभिनय तर सर्वांनाच आवडतो पण तिची आणखी एक गोष्ट जी सर्वांना भुरळ पाडते ते म्हणजे तिचे स्टायलिश राहणीमान. कार्यक्रम कोणताही असो तिथे ही ‘देसी गर्ल’ आपल्या अनोख्या फॅशन आणि स्टाइल स्टेटमेंटने सर्वांचंच लक्ष वेधून घेते. ‘ऑस्कर’ आणि ‘एमी’ पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अवतरताना तिने परिधान केलेल्या ड्रेसनंतर आता ‘युनिसेफ’च्या (UNICEF) कार्यक्रमातील तिच्या ड्रेसची सर्वत्र चर्चा होत आहे. ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे या ड्रेसची किंमत.
‘युनिसेफ’द्वारा आयोजित केलेल्या ‘ग्लोबल गोल्स अवॉर्ड्स २०१७’ मध्ये प्रियांकाने क्रिस्टियन सिरियानोच्या कलेक्शनमधील सुंदर पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. या कार्यक्रमात तिने सर्वांचंच लक्ष वेधलं. मात्र या ड्रेसची किंमत तुम्हाला माहित आहे का? ४५०० डॉलर म्हणजेच २,८९,७८० रुपये ही किंमत डोळे विस्फारायला लावणारी आहे. यावरुन, कलाकारांच्या आवडीनिवडी किती महाग असतात याचा पुरेपूर अंदाज येतो.
या कार्यक्रमात प्रियाकांने दिलेल्या भाषणात महिला सशक्तीकरणाचा मुद्दा मांडला आणि अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या महिलांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या एका महिलेचीही स्तुती केली. कार्यक्रमाचे काही फोटोसुद्धा तिने इन्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले. ”ग्लोबल गोल्स अवॉर्ड्स’मध्ये सहभागी होण्याचा सन्मान मला मिळाला. हा पुरस्कार मुलींनी आपलं जीवन बदलण्यासाठी घेतलेली भूमिका आणि विकासाच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीला दर्शवतो,’ असंही तिनं म्हटलंय.