सिनेमा, सौजन्य –
मिलान लुथरिया दिग्दर्शित  ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई-दोबारा’ हा चित्रपट दाऊद इब्राहिमवर आधारित आहे. बॉलीवूडने आजवर दाऊद या व्यक्तिरेखेवर आधारलेले वेगवेगळे चित्रपट दिले आहेत. ‘वन्स अपॉन अ टाइम’च्या निमित्ताने बॉलिवूडमधल्या दाऊदपटांचा आढावा..

‘डॉन को पकडम्ना मुश्कील ही नहीं, ना मुमकीन भी है’ हा प्रसिद्ध डायलॉग त्या ‘डॉन’ सिनेमाच्या बाबतीत जेवढा खरा होता तेवढाच तो आजही प्रत्यक्षरित्या आपल्या आयुष्यात खराच आहे. कारण आत्तापर्यंत आपले पोलीस खाते त्या ‘मोस्ट वॉन्टेड’ डॉन दाऊद इब्राहिमला प्रत्यक्षात काही पकडू शकलेले नाहीत. पण नुकत्याच प्रदíशत झालेल्या ‘डी-डे’ या चित्रपटात मात्र कराचीमध्ये लपलेल्या या डॉनला भारतीय गुप्तचर खात्याचे अधिकारी कशा प्रकारे पकडून भारतात आणतात याची कहाणी दाखवली आहे. त्यामुळे सिनेमात का होईना या अट्टल गुन्हेगाराला पकडल्याचे आपण समाधान मानू शकतो .
तसं पाहायला गेल्यास हिंदी चित्रपटसृष्टी आणि गुन्हेगारी विश्व यांचा कायमच जवळचा संबंध राहिलेला आहे. िहदी चित्रपटसृष्टीला नेहमीच या गुन्हेगारी विश्वाविषयी आकर्षण राहिले आहे. त्यामुळे या सराईत गुन्हेगारांच्या व्यक्तिरेखा असलेले चित्रपट किंवा या अव्वल गुन्हेगारांच्या आयुष्यावरून प्रेरित झालेले चित्रपट िहदी चित्रपटसृष्टीमध्ये कायमच बनत आलेले आहेत आणि मुंबई अंडरवर्ल्डने नेहमीच अशा हिंदी चित्रपटांना उत्तमोत्तम खाद्य पुरवले आहे. मुंबईचा कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम कासकर आणि त्याचे आयुष्य हा चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यांच्यासाठी अत्यंत आवडीचा विषय. त्याचे वैयक्तिक आयुष्य, नातेसंबंध आणि त्याचा व्यवसाय याचे अत्यंत नाटय़मय चित्रण अनेक चित्रपटांद्वारे पडद्यावर सातत्याने पाहायला मिळत असते. या वर्षांचा विचार केला तर या वर्षभरातच दाऊदच्या आयुष्यावरून प्रेरित असणाऱ्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धडक मारली आहे किंवा ते प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. यात संजय गुप्ता यांच्या ‘शूटआऊट अ‍ॅट वडाळा’, मिलन लूथरिया दिग्दíशत ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई-२’, ‘अब तक छप्पन-२’ तसेच कुमार तौरानी निर्मित विवेक ओबेरॉयची भूमिका असलेल्या चित्रपटाचा समावेश आहे.
मागच्या दशकभराचा विचार केला तर अशा गुन्हेगारांवर आधारित चित्रपटाचेच वर्चस्व आपल्याला दिसून येईल.

१९९०च्या दशकाच्या अखेरीला मुंबई गुन्हेगारी विश्वच एक वेगळ्या पद्धतीने सादरीकरण करणारा चित्रपट आला रामगोपाल वर्माचा ‘सत्या’. नेहमीच्या क्राइम फिल्म्स या पठडीतल्या चित्रपटापेक्षा हा चित्रपट अतिशय वेगळा होता. जागतिकीकरणाचा परिणाम, बिल्डर, चित्रपट निर्माते, राजकारणी आणि पुढारी लोकांची या गुन्हेगारी विश्वावर असणारी पकड तसेच सर्वच व्यवस्थापनांचे एकमेकांशी असलेले साटेलोटे आणि त्यांचा प्रत्यक्ष सहभाग याचे एक संघटित स्वरूप या चित्रपटातून पाहायला मिळाले. संघटित गुन्हेगारीचे मॉडर्न स्वरूप दाखवणारा बहुतेक हा पहिलाच चित्रपट. पण गुन्हेगारी जगताचं भडक चित्रण आणि यातील प्रचंड हाणामारी यामुळे हा चित्रपट बरेच दिवस चच्रेत राहिला. या चित्रपटाला सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले तसेच परीक्षकांचा उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही मिळाला.
नंतर रामगोपाल वर्मा यांच्याच २००२ सालच्या ‘कंपनी’ या चित्रपटामध्ये अजय देवगण याने साकारलेल्या भूमिकेची व्यक्तिरेखा खऱ्या अर्थाने दाऊद इब्राहिमच्या व्यक्तिरेखेशी साधम्र्य साधणारी होती, तर छोटा राजनची भूमिका साकारली होती विवेक ओबेरॉय याने. गुन्हेगारी विश्वातील डॉनचे आपसातील संबंध, त्यांच्यातील संघर्ष आणि या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी स्वीकारलेला वेगळा दृष्टिकोन या चित्रपटामधून परिणामकारक दाखवण्यात आला. तत्कालीन पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांच्या भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार मोहन लाल यांनी प्रथमच हिंदी चित्रपटात काम केले होते. या चित्रपटालाही तब्बल सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.
रामगोपाल वर्मा यांच्याच विश्राम सावंत दिग्दर्शित ‘डी’ या चित्रपटामध्ये रणदीप हूडा या अभिनेत्याने साकारलेली व्यक्तिरेखासुद्धा अंडरवर्ल्ड डॉनच्या आयुष्यावर आधारित होती. यामध्येही गुन्हेगारांच्या कारवाया कशाप्रकारे चालत असतात ते दाखवण्यात आले होते.
अनुराग कश्यप दिग्दर्शित, पत्रकार हुसेन जैदी यांच्या पुस्तकावर आधारित ‘ब्लॅक फ्रायडे’ या चित्रपटात पहिल्यांदाच दाऊद इब्राहिमचेच नाव त्यातील विजय मौर्या या अभिनेत्याने साकारलेल्या भूमिकेला देण्यात आले होते. मुंबई बॉम्बस्फोटामध्ये असलेला दाऊद आणि इतर गुन्हेगारांचा सहभाग यात अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय वास्तववादी चित्रण असल्यामुळे हा चित्रपट वादग्रस्त ठरला आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनावरही बंदी घालण्यात आली होती.

२००७साली प्रदर्शित झालेल्या अपूर्व लाखिया यांनी दिग्दíशत केलेला ‘शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला’ ह्य चित्रपटात गुन्हेगारी जगतातील टोळीयुद्धाचे अंतरंग दाखवण्यात आले होते. ८०च्या दशकातील मुंबईतील टोळ्यांमधील चकमकी ९०च्या दशकाच्या मध्यापर्यंत संपत आल्या होत्या. अनेक टोळ्या आपापसात लढून विखुरल्या जाऊ लागल्या होत्या. त्यामुळे  जवळपास १०-१२ वर्षांचा हा काळ मुंबई अंडरवर्ल्डसाठी अत्यंत खळबळजनक असाच होता. अशाच वेळेस मुंबई पोलिसांमध्ये या टोळ्यांविरुद्ध लढणारे एनकाऊंटर स्पेशालिस्ट तयार होत होते. पोलिस विरुद्ध गुंडांच्या अशाच एका थरार नाटय़ाचे कथानक ‘शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला’ या चित्रपटात गुंफण्यात आले होते. डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगमधील शार्पशूटर माया डोळस याचे एनकाऊंटर पोलीस अधिकारी ए. खान यांनी मुंबईतील लोखंडवाला परिसरात केलेले होते. याच घटनेने प्रेरित होऊन हा चित्रपट बनवण्यात आला होता. तत्कालीन साहाय्यक पोलीस आयुक्त खानची भूमिका संजय दत्त याने तर माया डोळसची भूमिका पडद्यावर साकारली होती विवेक ओबेरॉय याने.
२०१०साली आलेल्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटात दिग्दर्शक मिलान लुथरिया आपल्याला थेट १९७०च्या मुंबई अंडरवर्ल्डच्या जगात घेऊन जातात. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट डॉन हाजी मस्तान आणि त्याचा त्या वेळेस त्याचा हस्तक असणारा दाऊद इब्राहिम यांच्यातील एकमेकांच्या नातेसंबंधांवर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटात सुलतान मीर्झा (हाजी मस्तान) याची भूमिका अजय देवगण याने तर शोएब खान (दाऊद इब्राहिम) याची भूमिका इम्रान हशमी याने साकारली होती. उत्तम पटकथा आणि अभिनयाच्या जोरावर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळवले होते.
मुंबईतील गुंड मन्या सुर्वे याचा मुंबईतील वडाळा येथे झालेल्या एनकाऊंरवर आधारित ‘शूटआऊट अ‍ॅट वडाला’ हा संजय गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपटही पत्रकार हुसेन झैदी यांच्या ‘डोंगरी ते दुबई’ या पुस्तकातील एका भागावर आधारित होता. या चित्रपटात मन्या सुर्वेची भूमिका जॉन अब्राहम याने केली होती. दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ यांनी मुंबई गुन्हेगारी विश्वावर आपला ताबा ठेवण्यासाठी केलेला जिवाचा आटापिटा या चित्रपटाद्वारे आपल्याला कळू शकतो. संजय गुप्ता यानेसुद्धा या चित्रपटात दाऊद (सोनू सूद) आणि त्याचा मोठा भाऊ साबिर (मनोज बाजपई) यांची नावे चित्रपटातील व्यक्तिरेखेला दिली होती, पण नंतर मात्र ही नावे बदलून दिल्वर आणि झुबेर अशी करण्यात आली.
चित्रपटातील िहसाचार आणि गुन्हेगारी विश्वाचे भडक चित्रण यांवर वेळोवेळी प्रसारमाध्यमातून टीका करण्यात आलेली आहे. गुन्हेगारांचे असे उदात्तीकरण करून आपण एक प्रकारे तरुण पिढीसमोर चुकीचा आदर्श ठेवत आहोत असे अनेक जणांना वाटतं. पोलीस दफ्तरी ज्या गुंडांची नावे मोस्ट वॉन्टेडच्या यादीत आहेत अशा गुन्हेगारांना चित्रपटाद्वारे मात्र हीरो बनवले जाते आणि त्यांच्या कृतीचे एकप्रकारे समर्थनही केले जाते. पण दिग्दर्शकांच्या मते त्यांच्या फिल्म्स ह्य एक कल्पित कथानक असतात त्यामुळे त्या फक्त करमणुकीपुरत्या स्वीकारायच्या असतात. सिनेमा आणि वास्तव यात जमीन-अस्मानचा फरक आहे त्यामुळे अशी गल्लत करणे चुकीचे आहे. शिवाय त्यांच्या म्हणण्यानुसार सुज्ञ प्रेक्षकांना चित्रपट आणि वास्तव यातील फरक चांगलाच कळतो. त्यामुळे चित्रपटाद्वारे हिंसाचार वाढतो असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.
नुकताच प्रदर्शित होणारा मिलान लुथरिया दिग्दर्शित ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई-दोबारा’ हा बालाजी मोशन पिक्चर्सचा चित्रपटही दाऊद इब्राहिमच्या तथाकथित सट्टेबाजीत असणाऱ्या सहभागावर आधारित आहे. गुन्हेगारी विश्वाच्या पाश्र्वभूमीवर दोन मित्रांच्या एकाच मुलीवर असणारे प्रेम आणि त्यामुळे त्यांच्यात आलेले वितुष्ट असे या चित्रपटाचे साधारणत: कथानक आहे. अक्षयकुमार या चित्रपटात प्रमुख भूमिका करत असून सोबत आहे इम्रान खान.
१९७० आणि ८०च्या दशकातही गुन्हेगारी विश्वावर आधारित चित्रपट बनत होतेच. प्रकाश मेहरा यांचा ‘जंजीर’, यश चोप्रा यांचा ‘दीवार’, मनमोहन देसाई यांचा ‘अमर अकबर अँथनी’ आणि चंद्रा बारोट यांचा ‘डॉन’ यांसारख्या चित्रपटांनी तस्करी, गुंडगिरी, खुनाखुनी यांचे चित्रण केले होते. अर्थात त्या चित्रपटांना अजून बऱ्याच भावनिक छटा होत्या. एकंदरीतच हिंदी चित्रपटांमध्ये अशा माफिया गुन्हेगारांवर आधारित चित्रपट यापुढेही बनत राहतीलच. जोपर्यंत प्रेक्षकांना  अंडरवर्ल्ड आकर्षति करत राहील तोपर्यंत त्यांना त्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने करमणूक करण्यात हिंदी चित्रपटसृष्टी आपली धन्यताच मानेल हे नक्की.