अभिनेता ऋषी कपूर त्यांच्या ट्विट्समुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. कपूर घराणे आणि हिंदी चित्रपटसृष्टी यांच्यामध्ये एक प्रकारचे घनिष्ट नाते आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. आजवर या कुटुंबातील अनेक पिढ्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचे योगदान दिले आहे. असे असतानाच बॉलिवूडवर ‘खान’ मंडळींचा असणारा दबदबाही नाकारता येण्यासारखा नाहीये. याच ‘खान’ अभिनेत्यांपैकी एकाचा म्हणजेच अभिनेता आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगावर या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. सध्या प्रेक्षकांच्या मनावर आणि तिकीटबारीवरही ‘दंगल’चेच राज्य आहे. या चित्रपटामध्ये भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराची प्रशंसा केली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनीही या चित्रपटातील आमिरच्या भूमिकेचे तोंड भरुन कौतुक केले आहे. त्यातच आता आणखीन एका अभिनेत्याची भर पडली आहे.
अभिनेता ऋषी कपूर यांनी ‘दंगल’ चित्रपट पाहिल्यानंतर आमिरच्या अभिनयाची प्रशंसा केली आणि त्याची तुलना बॉलिवूडचे ‘ग्रेट शो मॅन’ राज कपूर यांच्यासोबत केली आहे. सध्याच्या घडीला आमिरच बॉलिवूडमधील राज कपूर आहे असे म्हणत आमिरच्या प्रशंसनार्थ एक ट्विट केले होते. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशा सर्व भूमिकांना न्याय देणाऱ्या राज कपूर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत ‘शो मॅन’ म्हणूनही ओळखले जायचे. चित्रपटांमध्ये असणारी प्रमाणबद्धता आणि त्या चित्रपटांमध्ये असणारे परफेक्शन या राज कपूर यांच्या चित्रपटांमधील महत्त्वाच्या गोष्टी होत्या. आमिर खानच्याही चित्रपटांमध्ये तो शक्य त्या परिने चित्रपटाच्या कथानकाशी न्याय करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात यशस्वीसुद्धा होतो. त्यामुळेच ऋषी कपूर यांनी आमिरची तुलना राज कपूर यांच्याशी केली असावी. ऋषी कपूर यांच्या या ट्विटचे आभार मानत आमिरने लिहिले की, ‘माझी ही प्रशंसा खूप मोठी बाब आहे. मी त्यासाठी तुमचा आभारी आहे’.
https://twitter.com/aamir_khan/status/815584687414358017
दरम्यान, सध्या ‘दंगल’ हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. २०१६ या वर्षामध्ये प्रदर्शित झालेल्या विविध चित्रपटांमध्ये आमिरच्या ‘दंगल’ या चित्रपटाने चांगलीच बाजी मारली आहे. अनेक चित्रपटांच्या कमाईच्या आकड्याला पिछाडत ‘दंगल’ या चित्रपटाने तिकीटबारीवर २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. २३ डिसेंबर २०१६ ला प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ या चित्रपटात आमिर खान, साक्षी तन्वर, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, झायरा वसिम आणि सुहानी भटनागर यांच्या मुख्य भूमिका आहेत.