दंगल या वर्षातला असा सिनेमा आहे जो बघण्यासाठी सारेच उत्सुक असतील. या सिनेमासाठी करावी लागलेली मेहनत ही इतर सिनेमांपेक्षाही जास्त आहे. या सिनेमासाठी आमिरला एकदा वजन कमी करावे लागले तर एकदा वाढवावेही लागले. वजनाकडे लक्ष देत असतानाच कुस्तीचे प्रशिक्षणही घ्यायचे होते. हे सगळे आमिरने कसे केले याचा व्हिडिओ तर आपण याआधी पाहिला पण आता त्याच्या सिनेमातल्या मुलींनी प्रशिक्षणासाठी घेतलेली मेहनत बघाल तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

हा व्हिडिओ बघताना तुम्हाला कळून येईल की, कसे चारही मुलींनी सान्या मल्होत्रा (बबीता कुमारी) सुहानी भटनागर (तरुणपणीची बबीता), फातिमा सना शेख (गीता फोगट), जायरा वसीम (तरुणपणीची गीता फोगट) यांनी कसून मेहनत घेतली आहे. या चारही मुलींनी अगदी थोड्या दिवसात स्वतःचे एका कुस्तीपटूमध्ये परिवर्तन केले आहे. दंगलच्या या मुलींना कसे दररोजच्या कडक वेळापत्रकाचे पालन करावे लागत होते.

‘दंगल’च्या या मुलींना भारतीय कुस्तीपटुंचे प्रशिक्षक कृपा शंकर बिश्रोई बेनीवाल यांनीच प्रशिक्षण दिले आहे. ते म्हणाले की, या मुलींना त्याच वेळापत्रकाचे पालन करावे लागले, ज्या वेळापत्रकाचे पालन भारतीय कुस्तीपटुही करतात. यात कोणत्याही प्रकारची सूट नव्हती. या मुलींना सात महिने दुखापत एवढेच नाही तर प्रशिक्षणामध्ये हाडे तुटण्याच्या प्रसंगालाही सामोरे जावे लागले आहे. पण या सिनेमासाठी चारही मुलींनी अथक परिश्रम केले. आपल्याला एखादी जरी लहानशी दुखापत झाली तर आपण तिला मोठी बनवतो. हा व्हिडिओ फक्त आश्चर्यचकीतच करत नाही तर एक शिकवणही देतो.

या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, थोडी शारीरिकरित्या कमकूवत असणारी जायरा चित्रिकरणापर्यंत कशी वाघीण झाली. तिने कॅमेऱ्याच्यासमोर पहिलाच शॉट बरोबर दिला. तर फातिमा तिच्या पायाचे हाड मोडूनही प्रशिक्षणाला सतत येत होती. या सर्व मुली सात महिन्यांच्या कडक प्रशिक्षणानंतर समोरच्या खेळाडूंनाही सहज मात देतात. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या आयुष्यावर आधारीत ‘दंगल’ हा सिनेमा येत्या २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नीतेश तिवारी याने केले आहे.