प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित चित्रपट केल्यामुळे मुंबईतील रझा अकादमीने काढलेल्या फतव्याला ख्यातनाम संगीतकार ए.आर.रेहमानने प्रत्युत्तर दिले आहे. ‘मोहम्मद: मॅसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाचा मी निर्माता नाही, मी फक्त संगीत दिले आहे. माणुसकी जपणे, समाज घटकांत पसरलेले गैरसमज दूर करणे आणि प्रेम, दया, शांती या तत्त्वांनी जीवन जगणे, असा संदेश देणारा हा चित्रपट मी नाकारला असता तर मी अल्लाला काय उत्तर दिले असते? असा सवाल उपस्थित करीत ए.आर.रेहमानने रझा अकादमीच्या फतव्याला प्रत्युत्तर दिले.
‘मोहम्मद: मॅसेंजर ऑफ गॉड’ चित्रपटाला संगीत दिल्यावरून निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण देणारे पत्रक ए.आर.रेहमानने आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केले आहे. चांगल्या भावनेतूनच मी चित्रपटाला संगीत दिले. वाद निर्माण करण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी इस्लाम धर्माचा विद्वान नाही. पाश्चिमात्य विचारधारेत जगणारा असून प्रत्येकाला पारखत बसण्याऐवजी समाजातील प्रत्येकाला ते जसे आहेत तसे स्विकारून प्रेम देण्याचा माझा प्रयत्न असतो, असे स्पष्ट मत रेहमानने फेसबुकवर मांडले आहे.
दरम्यान, प्रेषित मोहम्मद यांचे चित्र रेखाटणे, त्यांची व्यक्तीरेखा साकारणे इस्लाममध्ये निषिद्ध मानले जाते, अशी भूमिका घेत रझा अकादमीने ए.आर.रेहमान आणि इराणी चित्रपट निर्माता माजिद माजिदी यांच्या ‘मोहम्मद: मॅसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाविरोधात बहिष्काराचा फतवा काढला. या चित्रपटाच्या माध्यमातून इस्लामचा उपहास केल्याचा आरोपही अकादमीने केला आहे. तसेच या चित्रपटावर बंदीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील पाठविण्यात आले आहे.