अभिनेता-दिग्दर्शक दीपक तिजोरीने त्याच्या लग्नाला कायदेशीर मान्यता नसल्याचे सांगत सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं होतं. शिवानीने तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट न घेताच दुसरे लग्न केले होते, त्यामुळे तिचे दीपकसोबतचे दुसरे लग्न कायदेशीररित्या अमान्य ठरत असल्याचे कळले होते. ‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शिवानीला दीपकचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय आहे. त्यामुळे त्यांच्यात या विषयावरुन नेहमीच वाद होत असतात. आता शिवानीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत पोटगीचीही मागणी केली आहे. तिच्या या मागणीमुळे दीपकने न्यायालयाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा दीपकला त्यांचे लग्न बेकायदा असल्याचे कळले तेव्हा दीपकने शिवानीविरोधात केस दाखल केली. या खटल्याबाबत वांद्रे न्यायालयात सुनावणीही झाली.

शिवानीने या संपूर्ण प्रकरणावर आतापर्यंत मौन धरले होते. पण, तिने ‘डीएनए’ वृत्तपत्राशी संवाद साधत आपले मत मांडले. शिवानी स्वतः एक फॅशन डिझायनर आहे. ‘दीपक आणि माझ्या लग्नाला २२ वर्षे झाली आम्हाला २० वर्षांची मुलगीही आहे. त्याने सभ्यता, नैतिकता, संवेदनशीलता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायव्यवस्थेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या’, असे ती म्हणाली.

‘सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा आमचा कौटुंबिक प्रश्न आहे आणि सध्या हे सगळं प्रकरण न्यायालयात सुरु असल्यामुळे मी काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला होता. मी एक प्रामाणिक आणि जबाबदार नागरिक आहे, त्यामुळे माझ्याकडे लपवण्यासारखे काहीच नाही. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाला योग्य तो निर्णय घेऊ द्यावा. मी आत्मविश्वासाने सांगू शकते की सत्याचाच विजय होईल.’, असेही तिने स्पष्ट केले.

दीपक, शिवानीसोबत गोरेगावच्या ४ बेडरूम फ्लॅटमध्ये राहात होता. पण बऱ्याच दिवसांपासून या दोघांमधील विस्तव काही केल्या जात नव्हता. शिवानीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करुन भरगच्च पोटगीची मागणी केली होती. दीपकला एवढी पोटगी देणे शक्य नव्हते म्हणून यासंदर्भात त्याने त्याच्या वकिलाशी बातचीत केली असता त्यांचे लग्न बेकायदेशीर असल्याचे सत्य त्याच्यासमोर आले होते.