पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या ‘वरना’ या चित्रपटावरील बंदीच्या मागणीचा अभिनेत्री दीपिका पदुकोणने विरोध केला आहे. सत्तेचा गैरवापर करुन राज्यपालांचा मुलगा कसा बलात्काराच्या आरोपातून सुटतो, यावर ‘वरना’ चित्रपटाचं कथानक बेतलं आहे. त्यामुळेच पाक सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट रोखून धरल्याचं म्हटलं जात आहे. तर बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात दीपिकाने माहिराची साथ दिली आहे.
दीपिका सध्या तिच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशनच्याच एका कार्यक्रमात तिला माहिराच्या चित्रपटाला होत असलेल्या विरोधावर प्रश्न विचारला गेला. त्यावर ती म्हणाली की, ‘काही ठराविक लोक चित्रपटाची ताकद काय असते हे समजू शकत नाहीत. चित्रपट कोणते बदल घडवून आणू शकतो हे त्यांना कळत नाही. लोकांना एकत्र आणण्यात, प्रेम भावना पसरवण्यात चित्रपटांची मोठी भूमिका आहे. काही गटांना हे कळत नाही याचं दु:ख वाटतं.’
https://www.instagram.com/p/BbZmSnGh7kZ/
दिग्दर्शक शोएब मन्सूर यांच्या ‘वरना’ चित्रपटाला पाक सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दाखवलेला नाही. हा चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता त्याचा ‘बिग लाहोर प्रिमियर’ही रद्द करावा लागला आहे. ‘बलात्काराचा विषय आहे. दोषी राज्यपालांचा मुलगा दाखवला आहे. म्हणून चित्रपटावर बंदी आणण्याची गरज नाही. काही दृष्यांना कात्री लावून आणि थोडे बदल करुन चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.’ असं ‘सिंध बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉर’चे सरचिटणीस अब्दुल खुहावर म्हणाले.